Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbhaWomen's WorldWorld update

मातृतीर्थावर आज उसळणार लाखोंचा जनसागर!

– पूर्वसंध्येला राजे लखुजीराव जाधव वाड्यावर दीपोत्सव, राजवाडा उजळला!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सालाबादप्रमाणे याहीवर्षी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळून निघाला होता. उद्या (दि.१२) राजमाता जिजाऊंचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून, जिल्हा प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून या सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय मुंबई यांनी आयोजित केलेला जिजाऊ गाथा हा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे संपन्न होणार असून, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रसिध्द कलावंत सहभागी होणार आहेत. मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता जन्मस्थळ राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यासह महापूजेने संपन्न होईल, मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्यावतीने ही महापूजा केली जाते. त्यानंतर सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा जन्मस्थळ राजवाडा ते जिजाऊ सृष्टी येथून भव्य पालखीसह निघेल. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंड्यांचा सहभाग असेल व सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहन संपन्न होईल. आज या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा फुलांनी सजवण्यात आला. तर राजमाता जिजाऊ यांची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आली होती. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिला उपस्थित होत्या. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ प्रकाशमान झाले होते. शेकडो महिलांनी हातात मशाली घेऊन सिंदखेडराजा शहरातून रॅली काढली. याप्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना घेतली. तसेच जय जिजाऊ जय शिवराय, अशा गगनभेदी घोषणा दिल्या. पहिल्यांदाच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंदखेडराजा शहर व परिसरातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात बहुजन समाज एकवटला होता.
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी उद्या सिंदखेडराजा येथे देश विदेशातून लाखो जिजाऊ भक्त हे जिजाऊ मॉसाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार असून, जिजाऊ भक्तांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. १२ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदय समयी मॉसाहेबांची महापूजा होणार आहे. मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्यावतीने ही महापूजा केली जाते. त्याच बरोबर राज्यभरातील जाधव वंशजदेखील येथे येऊन जिजाऊ चरणी नतमस्तक होतात. दरम्यान, मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ सृष्टी येथे विविध कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले असून, येथील तयारी जोरात सुरू असल्याचे जिजाऊ जन्मोत्सव समितीचे समन्वयक सुभाष कोल्हे यांनी सांगितले. दुसरीकडे, राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा अर्थात जिजाऊ मॉसाहेब यांचे जन्मस्थळ आकर्षक पद्धतीने सजविले गेले आहे.
उद्या सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा जन्मस्थळ राजवाडा ते जिजाऊ सृष्टी येथून भव्य पालखीसह निघून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंड्यांचा सहभाग असेल व सकाळी ९ वाजता जिजाऊसृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहन संपन्न होईल व सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान शाहिरांचे पोवाडे या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहीर आपल्या संचासह पोवाडे सादर करतील. सकाळी ११ ते १.३० पर्यंत जिजाऊ सृष्टी हॉल येथे नवोदित वक्ते, नवोदित कलाकार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या कामगिरी केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा व नोंदणी केलेल्या जोडप्यांचा सामूहिक शिवविवाह सोहळा संपन्न होईल. मुख्य कार्यक्रम दुपारी २ ते ६ या वेळी शिवश्री अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठा सेवा संघाचे व ३२ कक्षांचे केंद्रीय कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघाचे सर्वोच्च पुरस्कार, मराठा विश्वभूषण पुरस्कार, मराठा क्रीडा भूषण पुरस्कार आदी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील व शेवटी समारोपीय मार्गदर्शन अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांचे होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खेडेकर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या सोहळ्यासाठी ४०० बुक स्टॉल, १०० भोजन स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये मराठा सेवा संघ व बहुजन विचारधारा असलेले वैचारिक प्रबोधनाचे साहित्य, महामानवांचे पुतळे प्रतिमा, इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. वाहनतळ निर्मिती, हेलिपॅड निर्मिती, रस्ते, वैद्यकीय पथक, सुरक्षारक्षक पथक, आपत्तकालीन पथक, नियंत्रण कक्ष, चौकशी कक्ष, आयोजन समिती, कार्यालय स्वच्छतागृहे, भव्य विचारमंच उभारण्यात आलेला आहे.
शेतकरी बांधवांसाठी विठ्ठलराव विखे पाटील कृषी दालन उभारण्यात आले असून, यामध्ये शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन केंद्र, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती अवजारे, विविध बीजउत्पादक रसायनिक खते, औषधे इत्यादी कंपन्या सहभागी होणार आहेत. याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक दालन सुध्दा उभारण्यात आलेला आहे.


पोलिसांचा तगडा बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ जन्मोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २ डीवायएसपी, १८ पोलीस निरीक्षक, ३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३८० पोलीस अंमलदार, ५१ महिला पोलीस अंमलदार, ११५ वाहतूक पोलीस अंमलदार, ३० साधे वेशातील पोलीस कर्मचारी, २२ कॅमेरामॅन, २६ पोलीस जीप, २ आर.सी.पी तसेच अमरावती ग्रामीण, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. त्यामध्ये २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३०० पोलीस अंमलदार, १०० महिला पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. बंदोबस्त अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांचा समावेश आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!