BuldanaBULDHANAHead linesVidharbha

अनुदानाअभावी गेल्यावर्षीचे मिनी ट्रॅक्टर वाटप रखडले!

– अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांनी अर्ज करावे – सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांचे आवाहन

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर उपसाधनासह मिनीटॅ्रक्टर देण्यात येणार आहे. यासाठी सदर बचत गटांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी केले आहे. विशेष म्हणजे, अनुदानाअभावी गेल्या वर्षीच्या मिनीट्रॅक्टरचे वाटप मात्र अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सन २०२३-२०२४ साठी ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनीट्रॅक्टर उपसाधनासह नव्वद टक्के अनुदानावर देण्यात येणार असून, दहा टक्के लाभार्थी हिस्सा सदर बचत गटांना भरावा लागणार आहे. यामध्ये तीन लाख पंचवीस हजार अनुदान असून, ३५ हजार रूपयांचा लाभार्थी हिस्सा आहे. यासाठी सदर बचत गटातील सदस्य महाराष्ट्रील रहिवासी असावे, स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावे, सदर बचत गटातील अध्यक्ष व सचिवदेखील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावे, बचत गटाकड़े सक्षम अधिकार्‍याचे नोंदणी प्रमाणपत्र असावे, बचत गटाची मूळ यादी, घटना व नियमावली तसेच गटातील सदस्यांचे सक्षम अधिकार्‍याचे जात व अधिवास प्रमाणपत्र जोड़ावे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेतर्गत अनुज्ञेय असलेल्या ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करता येतील मात्र अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम सदर बचत गटांना भरावी लागेल. तरी इच्छूक बचत गटांनी १५ जानेवारीपर्यंत विहीत नमुन्यात ़आपले अर्ज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील समाजकल्याण विभाग कार्यालयात जमा करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी केले आहे.


विशेष म्हणजे, गेल्या वर्षीचे अर्थात सन २०२२-२३ चे मिनीट्रॅक्टर वाटप अनुदानाअभावी अद्यापपर्यंत करण्यात आले नाही. यासाठी गेल्या वर्षी पन्नास बचत गटांनी अर्ज केले असल्याची माहिती आहे. अनुदान मागणीसाठी राज्य शासनाकड़े वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे समाजकल्याण विभागाचे वाघमारे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


  • मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य
    – बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.
  • मिनी ट्रॅक्टर योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव
    – अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी
  • मिनी ट्रॅक्टर योजनेचे लाभार्थी
    – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप
    – मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!