– शशिकांत खेडेकर, विनोद वाघ यांच्यानंतर आणखी एक इच्छूक मैदानात!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ हे इच्छूक असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील या मतदारसंघाच्या संभाव्य आखाड्यात उडी घेतली आहे. मनसेचे विद्यार्थी आघाडी प्रमुख शिवा दादा पुरंदरे यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालवली आहे. पक्षाने संधी दिली तर आपण विधानसभा निवडणूक लढवू, व जिंकूदेखील असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे. पुरंदरे यांनी थेट विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात दंड थोपाटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी प्रमुख तथा युवा नेते म्हणून उदयास आलेले शिवा दादा पुरंदरे यांनी सांगितले, की आपण पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. शहर अध्यक्ष पदापासून जिल्हा अध्यक्ष पदावर आपण काम केलेले आहे, शिवाय एक तरुण चेहरा म्हणून सुद्धा बघितले जाते. शेतकर्यांचा प्रश्न असेल, विधवा महिलांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल यांच्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने केली आहे, असे पुरंदरे म्हणालेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला २८ हजार मतदान मिळाले आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, अशी पुरंदरे यांची इच्छा आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये आपण दमदार काम करत असून, यंदा पक्षाने तरूण चेहरा व कामाचा लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली तर या संधीचे सोने करू, असा दावाही पुरंदरे यांनी केला आहे.
————-