– ‘भाग्यश्री विसपुते कलेक्टर असताना वाळूचा खडा उचलला गेला नाही, किरण पाटलांच्या काळात वाळूतस्करी जोमात’!
– पूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
सिंदखेडराजा/चिखली (अनिल दराडे/कैलास आंधळे) – खडपूर्णा धरण परिसरातील पूर्णा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे टिप्पर अडविल्यानंतर इसरूळचे माजी सरपंच तथा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी देऊळगावराजा, तहसीलदार देऊळगावराजा यांच्याबद्दल गैरउद्गार काढल्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चार दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत असून, भुतेकर हे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना चक्क भ्रष्ट, लाज सोडलेला, मूर्ख वैगरे म्हणत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओची सत्यता ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने पटवली नसली तरी, पोलिसांनी व महसूल प्रशासनाने तातडीने या व्हायरल व्हिडिओची दखल घेण्याची गरज असून, व्हिडिओ खरा असेल तर तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतून उमटत आहेत. वाळूतस्करीच्या आडून एखाद्या सनदी व आयएएस प्रशासकीय अधिकार्यांची अशा प्रकारे बदनामी म्हणजे ती सरकारची बदनामी असते, त्यामुळे राज्य सरकार याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ येथील माजी सरपंच संतोष पाटील भुतेकर यांनी दि. २५ डिसेंबररोजी भल्या पहाटे इसरुळ-मलगी रोडवर रेती वाहतूक करणारे टिप्पर अडवले. हे रेती वाहतूक करणारी वाहने वैध आहेत की अवैध आहेत, याची तपासणीही संबंधित तहसीलदारांनी करण्याची गरज आहे. ही वाहने अडवून धरल्यानंतर संतोष पाटील भुतेकर यांनी एक व्हिडिओ तयार केल्याचे दिसत असून, हा व्हिडिओ या बातमीसोबत जसाच्या तसा प्रसारित करत आहोत. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत आम्ही फारसी खात्री करू शकलो नाहीत. तथापि, हा व्हिडिओ खरा असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या व्हिडिओत भुतेकर हे राज्याचे सनदी अधिकारी असलेले जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा बोलताना दिसत आहेत. खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणार्या अवैध रेती उपसासंदर्भात व अवैधरित्या वाहतूक करणार्या अवजड वाहनांसंदर्भात जिल्हाधिकारी बुलढाणा व सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी व देऊळगावराजाचे तहसीलदार यांना जबाबदार धरत त्यांचा अतिशय बदनामीकारक शब्दात निषेध केला जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांच्यासारख्या जिल्ह्याच्या प्रमुखाला तथा जिल्हादंडाधिकारी यांना जाहीरपणे भ्रष्ट, निर्लज्ज, मूर्ख वैगरे म्हटले जात असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. महसूल प्रशासनावर टीका करताना वैयक्तिक जिल्हाधिकारी यांची बदनामी करणे हे बेकायदेशीर असले तरी, असा प्रकार घडला असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने या व्हिडिओची दखल घेणे गरजेचे असून, कारण जिल्हाधिकारी यांची प्रतिमाहनन म्हणजे तो राज्य सरकारच्याही प्रतिमाहननाचा प्रकार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
खडकपूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी हा गंभीर प्रकार असून, या प्रकाराकडे स्थानिक महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांत महसूल प्रशासनाविषयी तीव्र संताप आहे. अवैध वाळूतस्करीमुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. मलगी फाटा ते इसरूळ या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, याला फक्त वाळूतस्करीच कारणीभूत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाबाबत जनतेत तीव्र संतापाची लाट आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याबद्दल अशाप्रकारे खालच्या पातळीवरची भाषा वापरणे मात्र गैर असून, त्याबद्दल राज्य सरकार व जिल्हाधिकारी हे संतोष भुतेकर यांच्यावर काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.