– संत गजानन महाराजांचे समाधीमंदीर रात्रभर खुले राहणार!
बुलढाणा/शेगाव (बाळू वानखेडे) – योगीराज संत श्री गजानन महाराजांच्या साक्षीने मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे संकल्प करण्यासाठी दरवर्षी ३१ डिसेंबरला लाखावर भाविक विदर्भ पंढरी शेगावात दाखल होतात. भाविकांची वाढती गर्दी पाहता, त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संत गजानन महाराज संस्थान ३१ डिसेंबरला रात्रभर श्रींच्या दर्शनाचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराजांचे मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
दरवर्षी नाताळ सुट्या, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्या गर्दीचे नियोजन योग्यरीतीने व्हावे या उद्देशाने ३१ डिसेंबररोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री येणार्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करता येणार आहे.
श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्यावतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.
भाविकांची वाढती गर्दी पाहता घेतला निर्णय
दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात. यामुळे ३१ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे संस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे.
———–