बिबी (ऋषी दंदाले) – बिबी येथून जवळच असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी येथील रहिवासी अनंता दत्तात्रय गिते (वय ४७) हे हरियानामधील हिसार येथे सैन्यदलात सेवा बजावित असतांनाच २४ डिसेंबररोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात जागदरी येथे काल अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा कपील यांनी मोठ्या दु:खद अंतःकरणाने भडाग्नि दिला.
जागदरी येथील सुभेदार अनंता दत्तात्रय गिते यांची सैनिक दलात २७ वर्ष ४ महिने सेवा झाली. हिसार येथे सेवा बजावित असतांनाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सुभेदार अनंता दत्तात्रय गिते यांचे पार्थिव सैनिक दलाच्या वाहनातून छत्रपती संभाजीनगर येथून थेट जागदरी येथे आणण्यात आले. त्यांच्याच शेतात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव, माजीमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा पक्ष प्रवक्ते विनोद वाघ यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तर शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सचिन जैस्वाल, साखरखेर्डा येथील ठाणेदार स्वप्निल नाईक, बिबी ठाणेदार सदानंद सोनकांबळे, लोणार, किनगाव राजा येथील ठाणेदार यांनीही पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. देशासाठी प्राणाची बाजी लावून लढणार्या सैनिकांना अखेरची सलामी देण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी ह्रदयाला पाझर फुटल्याशिवाय राहातं नाही. काल हजारोंचा जनसागर शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित झाला. त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले, अशी भावपूर्ण श्रद्धांजली शासनाच्यावतीने माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अर्पण केली.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनीही श्रध्दांजली अर्पण केली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंद्री बोडखे, तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान चाटे, तालुकाध्यक्ष भिमराव उबाळे यासह ३०० माजी सैनिकांनी सलामी दिली. तर पोलीस दलाच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ तोफांची सलामी देत अनंता गिते यांच्यावर जागदरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी ११:३० वाजता सैनिक दलाच्या सजविलेल्या रथातून पार्थिव जागदरी गावात येताच सुभेदार अनंता गिते साहेब ‘अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर भावविभोर झाला होता. सुभेदार अनंता गिते यांचे पार्थिव देहाला चिरंजीव कपिल आणि कु. कोमल यांनी भडाग्नि दिला, त्यावेळी परिसर सुन्न झाला होता.