– रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी डॉ. विकास मिसाळ यांच्या ठिय्या आंदोलनाच्या इशार्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने हालचाली!
चिखली (महेंद्र हिवाळे) – देऊळगावराजा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या मलगी ते इसरूळ या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, परिसरातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ या गावांतील ग्रामस्थ परेशान झाले होते. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी परिसरातील गावांतील सरपंचांना घेऊन आज (दि.२७) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. १५ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला असता, कार्यकारी अभियंत्यांनी त्यापूर्वीच रस्ता मजबुतीकरण व दुरूस्तीकरण सुरू करत आहोत, असे डॉ. मिसाळ यांच्यासह सरपंचांना सांगितले. त्यानंतर या कामाच्या पुढील कार्यवाहीची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे.
मलगी फाट्यापासून पुढे इसरूळपर्यंत असलेल्या या रस्त्याची सद्या प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मंगरूळचे सरपंच गणेशराव शिंदे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, शेळगाव आटोळचे उपसरपंच संतोष बोर्डे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख व ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. मलगी फाटा ते इसरूळ हा रस्ता प्रमाणीपेक्षा जास्त खराब झाला असून, या रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे १५ दिवसांत हा रस्ता दुरूस्त न केल्यास परिसरातील ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आला. त्यावर अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेत, कार्यकारी अभियंत्यांनी त्यापूर्वीच हा रस्ता मजबुतीकरण व दुरूस्ती करू, असे आश्वासन देत लगेच पुढील कार्यवाहीचे आदेशदेखील आपल्या यंत्रणेला दिले आहेत. त्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी डॉ. मिसाळ, संबंधित गावांचे सरपंच आणि कार्यकारी अभियंत्यांचेदेखील आभार व्यक्त केले आहेत.
मलगी ते इसरूळ या रस्त्याच्या कामासाठी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झालेला असून, हा रस्ता निविदा प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली तरी सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करू शकत नव्हते. परंतु, डॉ. विकास मिसाळ यांच्या पुढाकारानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
————