– विविध सामाजिक उपक्रम राबवित जपताहेत सामाजिक बांधिलकी!
मुंबई (रामेश्वर खरुळे) – अगदी कौटुंबीक जिव्हाळ्यातून ‘आम्ही मुंबईतील बुलढाणेकर’ या व्हाटसअप ग्रूपचे गेट टू गेदर मागील रविवारी (दि.२४) खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ या निसर्गरम्य व अध्यात्मिक ठिकाणी पार पडले. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात या ग्रूपने उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात हा स्नेहबंधाचा उपक्रम राबवित एक अनोखा आनंद सोहळा पार पाडला आहे. एखाद्या व्हाटसअप ग्रूपमार्फत काय काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात याचे एकमेव उदाहरण म्हणून हा ग्रूप नावलौकिकास येत आहे.
या व्हाटसअप ग्रूपचे अॅडमीन शेषराव सुसर यांनी सुरुवातीस सदर ग्रुप फक्त दहा ते पंधरा लोकांना संपर्कात राहण्यासाठी तयार केला होता. परंतु आज त्याला फांद्या फुटत चालल्या असून त्याचा वटवृक्ष होत आहे. सदर व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील परंतु मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या सर्वांचा आता समावेश झालेला आहे. यातील बहुतांशजण हे नातेवाईकही आहेत. तसेच काहींचे नाते जरी रक्ताचे नसले तरी त्यापेक्षा घट्ट झाले पाहिजे म्हणून रक्तदानासारखा कार्यक्रम राबविण्याची संकल्पना रामेश्वर खरुळे यांनी दिली. आणि आम्ही बुलढाणेकर या शीर्षकाखाली युनिक ब्लड मोटिव्हेटर्स आणि माजी विद्यार्थी शिशु विकास शाळा, यांनी संयुक्तिक बेतुरकर पाडा कल्याण (प.) येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी शेषराव सुसर, रामेश्वर खरुळे, स्वप्निल देशमुख, दिलीप घुबे यांनी रक्तदान शिबिर आयोजन करून पहिला समक्ष भेटीचा घेतलेला कार्यक्रम सत्कारणी लावला. या ग्रूपमधील किरण लहाने सर यांनी गेट टुगेदर बाबत सूचविले आणि जिल्ह्यातील लोकांचे गेट टुगेदर आयोजन करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी सदर कल्पनेचे ग्रूप अॅडमीन शेषराव सुसर आणि रामेश्वर खरुळे यांनी स्वागत केले आणि गेट टुगेदर सर्वांना सोईचा होईल याकरीता जागेच्या शोधापासून ते कॅटरिंग पर्यंतच्या सर्व बाबी शोधण्यास सुरुवात केली. त्याकरिता आयोजक मंडळीचा ग्रुप तयार करुन सर्वांना जबाबदारी देण्यात आली. या आयोजक मंडळीमध्ये शेषराव सुसर, किरण लहाने, रामेश्वर खरुळे, विनोद सुसर, पांडुरंग खडुळ, रामेश्वर गव्हाणे या मंडळींनी पुढाकार घेऊन ०८ ऑक्टोंबर २०२३ रोजी बदलापूर येथील कोंडेश्वर हे जवळचे आणि माहितीतील ठिकाण गेट टुगेदर करिता सर्वानुमते निश्चित करण्यात आले आणि ग्रूपमधील सदस्यांना गेट टुगेदरकरिता व परिचय करिता आवाहन करण्यात आले आणि बघता बघता ८० लोकांपेक्षा जास्त लोकांनी येण्याची इच्छा दर्शविली. परंतु काहींचे घरी अचानक अडथळे आल्याने ७२ लोकं या सहलीला आले. सदर वेळी आलेली मंडळी एकमेकांत असे रंगून गेले की ते वर्षानुवर्षे एकमेकांच्या परिचयाचे आहेत असे त्यांना वाटू लागले. हा आनंद सोहळा हर्षोल्हासात पार पडला. एखाद्या व्हॉट्सअप ग्रूपच्या माध्यमातून लोकं नातेवाईक असल्यासारखे एकत्र भेटू शकतात गेट टुगेदर करु शकतात हे उदाहरण पुढे आले. त्यामुळे त्याची दखल बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी घेतली व सर्वदूर प्रसिद्धी दिली गेली. त्याबाबतचे वृत्त वाचून गावांकडूनही अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करणारे फोन केलेत. मात्र काही कारणास्तव ज्यांना यायला जमले नव्हते त्यांना मनाला थोडे दुःख झाले की, आपल्या लोकांना त्यांना भेटता आले नाही म्हणून त्यांनी नंतर ग्रूप अॅडमीन यांना पुन्हा एकदा अशा गेट टू गेदरचे सहलीचे आयोजन करावे, अशी गळ घातली. त्यावर सर्वांनी सकारात्मक विचार करून रविवारी (दि.२४) दुसर्या गेट टू गेदरचे आयोजन केले. सर्वांच्या विचारानुसार लोकांना अवघ्या १०० रूपयांमध्ये सहलीचा आनंद द्यायचा असे ठरले. वास्तविक पाहाता, अवघ्या चहापाण्यालाच शंभर रूपये लागतात. तरीही कमी खर्चाचे नियोजन केले गेले. सर्वानुमते खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे रविवारी सहलीचे स्थान निश्चित केले. वास्तविक पाहाता, तेथे कोणतीही सहल नेण्यास परवानगी नाही. माईक वैगरे वापरता येत नाही. तरीही यावर तोडगा काढून ही सहल आयोजित केली गेली. ग्रूपमधील १२५ सदस्यांनी प्रतिसाद देऊन गगनगिरी महाराज यांचा मठ अनेक अडचणींवर मात करून गाठला. या सहलीकरिता नव्याने आयोजक म्हणून सहभागी झालेले चेतन गवते यांनी ठिकाणाचा आढावा घेण्यापासून ते सहलींचे दिवशी एक तास अगोदर जाऊन माफक दरात चहा आणि गरमागरम नाश्ता कुठे मिळेल याबाबत माहिती घेऊन ऑर्डर दिली होती. सदर वेळी मागविण्यात आलेल्या गरमागरम वडापाव वरती आणि चहाचा सर्वांनी आनंद घेतला. त्यामुळे सगळा प्रवासातील थकवा दूर झाला. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना रिक्षाने पाठवून देत, विनोद सुसर, चेतन गवते, राम गव्हाणे व राजेश जाधव यांनी पुढे जाऊन कूपन घेण्याची जबाबदारी स्वीकारली. उर्वरीत बाकी इतर तरूण मंडळींना शेषराव सुसर आणि रामेश्वर खरुळे हे अवघ्या १० मिनिटांवर मठ असल्याने गप्पा मारत चालत गगनगिरी महाराजांच्या मठाकडे गेले. सदर ठिकाणी सर्वांना कुपन देवून रांगेत गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन मठातील महाप्रसाद घेण्याच्या सूचना देऊन पुन्हा गुफेकडे जाणार्या रस्त्याकडे भेटण्यास सांगितले. सर्व एकत्र आल्यानंतर रामेश्वर खरुळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून नव्याने सहलीला आलेल्या लोकांचा परिचय करून घेतला. तसेच ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या सहाय्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील एका संस्थेने महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनावर सत्यशोधक हा चित्रपट काढला असून सर्वांनी तो पाहण्याचे चेतन गवते आणि टीमकडून आवाहन करण्यात आले. त्यानंतर किरण लहाने सर यांनी ग्रूपचे अध्यक्ष शेषराव सुसर यांचे पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले.
तसेच आयोजक मंडळातील राम गव्हाणे यांचे प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचेही सर्वांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले गेले. आलेल्या सर्व सदस्यांचे शेषराव सुसर यांनी आभार मानून आम्ही मुंबईतील बुलढाणेकर या ग्रूपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, ना नफा ना तोटा, या धर्तीवर दुसर्यांदा गेट टुगेदर व सहल आयोजित करत असल्याबाबत कल्पना दिली. तसेच ग्रूपच्या माध्यमातून गरीब, गरजु अशा चार लोकांना जवळजवळ एक लाख रुपये त्यांचे किंवा नातेवाईकांचे खात्यावर पाठव्रून वैद्यकीय मदत केली असल्याचे सांगून एकीच्या बळाचे पुन्हा एकदा महत्त्व पटवून दिले. किरण लहाने यांनी कार्यक्रमाची सांगता करून ज्या लोकांना परिसर फिरायचा होता त्यांना फिरण्याची मुभा देऊन बाकीचे इतरांना ठरल्याप्रमाणे ट्रेन पकडण्यासाठी रवाना झाले. एकीकडे महाराष्ट्रातील गढूळ होत चाललेले राजकारण, दुसरीकडे आरक्षणावरून एकमेकांमध्ये निर्माण होत चाललेली तेढ या सर्वांवर मात करत आम्ही मुंबईतील बुलढाणेकर हा व्हॉट्सअॅप ग्रूप खरोखरच माणुसकीचा इतिहास रचत असल्याचे दिसून आले आहे.