अंत्री खेडेकर येथेही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची अतोनात हेळसांड!
– महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून डॉक्टर रूग्णांना वार्यावर सोडून निघून गेले!
चिखली/देऊळगावराजा (कैलास आंधळे) – कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणार्या महिला रूग्णांची हेळसांड करण्याचे प्रकार बुलढाणा जिल्ह्यात चोहीकडे सुरूच असून, आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराने जनमाणसात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असतानाच, अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतलेल्या महिलांची अतोनात हेळसांड तसेच त्यांना वार्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य सेवकाने चक्क दोन टाईमचा डबा व अंडे देण्याचे आमिष दाखवून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे आमिष दाखवले असल्याचेही यावेळी उघडकीस आले.
देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना वार्यावर सोडून त्यांची हेळसांड करण्यात आल्याचा प्रकार कालच उघडकीस आला होता. या शस्त्रक्रियाबाधीत रूग्णांना वार्यावर सोडून डॉक्टर चक्क घरी निघून गेले होते. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर या महिलांना वैद्यकीय सुविधा मिळाली होती. तसाच, धक्कादायक प्रकार आज (दि.२६) अंत्री खेडेकर येथे उघडकीस आला. अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना संबंधित डॉक्टरने अक्षरशः वार्यावर सोडले होते. या महिलांवर कुणीही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. त्यांना पुरेशी वैद्यकीय सोयसुविधादेखील पुरवण्यात आलेली नव्हती. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर हे तब्बल २० किलोमीटर अंतराहून जाणे-येणे करत असून, शासकीय आदेशाची खुलेआम पायमल्ली सुरू आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या टीमने आरोग्य केंद्रास रात्रीच्यावेळी भेट दिली असता, शस्त्रक्रिया झालेल्या महिला कासावीस होऊन पडलेल्या होत्या. त्यांच्या देखभालीसाठी कोणताही डॉक्टर तेथे नव्हता. तसेच, त्यांच्या भोजन व औषधीची सोयदेखील करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. धक्कादायक बाब अशी, की कोलारा अंतर्गत येत असलेल्या खैरव येथील पेशंटला आरोग्य सेवक मुरकुट यांनी चक्क दोन्ही टाईमचा जेवणाचा डब्बा व अंडे देण्याचे आमिष दाखवून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्याचे यावेळी सांगितले गेले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे राष्ट्रीय महत्वपूर्ण कार्य असताना, येथील शासकीय डॉक्टर रूग्णांची हेळसांड करून व त्यांच्या प्रकृतीला धक्का पोहोचून राष्ट्रीय कार्यात मोठी बाधा पोहोचवत आहेत. तसेच, जनमाणसांत या महत्वपूर्ण कार्याबद्दल चुकीचा मेसेज जात असल्याने या कामचुकार डॉक्टर व कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.
————–