सिंदखेडराजा (अनिल दराडे) – महसूल प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार निमगाव वायाळ येथे रेतीघाट सुरू केला असून, या रेतीघाटावर शासकीय नियम पायदळी तुडवून वारेमाप वाळूउपसा सुरू आहे. तसेच, कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. हा वारेमाप वाळू उपसा थांबवा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रत्येकक्षणाचे रेकॉर्डिंग करून त्याचा अहवाल ग्रामस्थांना द्या, वारेमाप वाळू उपशामुळे पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सिंदखेडराजा तहसीलदारांना निवेदन देत, प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
मौजे निमगांव वायाळ येथे शासनाच्या आदेशास अनुसरून जो रेतीघाट सुरू करण्यात आला आहे, त्या रेतीघाटामध्ये शासनाचे सर्व नियम, अटी व शर्ती पायदळी तुडवून केवळ ठेकेदाराचे हित साध्य करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचार्यांसोबत संगनमत करून शासनाचे लाखो रूपयाचे महसूल बुडविण्याचे मोठे नुकसान सुरू आहे. ठेकेदार अंदाधुंद उपसत असलेल्या रेतीला पायबंद न घातल्यास गांवकर्यांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ चालून येणार आहे. त्यास सर्वस्वी महसूल विभाग जबाबदार राहील, तसेच रेतीघाटावर वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास तहसीलदार जबाबदार समजून जनआंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निमगांव वायाळ येथे सुरू असलेल्या रेतीघाटावर केवळ लेबरचाच रेतीभरण्यासाठी वापर करण्यात यावा, पोकलॅन्डचा वापर करण्यात येऊ नये तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रत्येकक्षणाचा अहवाल ग्रामस्थांना देण्यात यावा, संबंधीत तक्रारींचे निवारण न झाल्यास तक्रारदार तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे अमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते देवानंद मुरलीधर सपकाळ यांनी तहसीलदारांना कळवले आहे. यानिमित्ताने शासकीय रेतीघाटावरील मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.