Breaking newsBuldanaHead linesVidharbha

माजी आ. धृपतराव सावळेंचा राजकीय वनवास संपला!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात राजकीय वनवास भोगणारे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार धृपतराव सावळे यांचा राजकीय वनवास अखेर संपला आहे. धृपतरावांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक व पणन महासंघ म. नागपूरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सावळे एक मुरब्बी व जनाधार असलेला नेता म्हणून परिचित आहेत. सरपंच ते आमदार व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. दोन पंचवार्षिकपूर्वी धृपतराव सावळे हे चिखली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून ते राजकीय वनवासात होते. सत्ताधारी भाजपात २०१५ मध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांना बुलढाण्याचे जिल्हाध्यक्षपद दिले होते. परंतु, त्यांच्या सक्रीय पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आगामी २०२४च्या निवडणुकीत त्यांची उपयोगिता लक्षात घेता, सत्ताधारी गटाकडून त्यांची पणन महासंघावर वर्णी लावली गेली आहे. ते बिनविरोध निवडून गेले आहेत. सावळे यांच्या सोयर्‍याधायर्‍यांच्या राजकारणाचा या निवडणुकीत काही जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो. धृपतरावांनी आतापर्यंत सहकार क्षेत्रातील जवळपास २५ निवडणुका जिंकल्या असून, दोनवेळा बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, एकवेळा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्षपद तर एकदा त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली असून, सामाजिक पटलावर ही त्यांची कामगिरी सर्वश्रुत आहे. डोंगरशेवलीचे सरपंच ते विधानसभेचे सदस्य, हा त्याचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. बर्‍याच महिन्याच्या राजकीय वनवासानंतर त्यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी आल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!