बिबीमार्गे चिखली-वाघाळा बस अचानक बंद; विद्यार्थी, ग्रामस्थांचे अतोनात हाल!
– वारंवार निवेदन देऊनसुद्धा एसटी महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – चिखली ते बिबीमार्गे वाघाळा जाणारी बस गेल्या एक महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही बससेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
सावखेड नागरे येथे श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालयात हिवरा, गडलिंग, वाघाळा व इतर गावाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी या शाळेत शिकतात. एक महिन्यापूर्वी चिखली ते बिबी ही बससेवा चालू होती. त्यामुळे प्रत्येकाकडे पासेस आहेत. परंतु एक महिन्यापासून ही बससेवा अचानक बंद केल्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये वाघाळापासून सावखेडपर्यंत दररोज लहान विद्यार्थ्यांाह अनेक विद्यार्थ्यांना सावखेड नागरेपर्यंत दररोज पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पायपीट करत असताना एखादा अनुचित प्रकारही घडू शकतो. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार चिखली आगारप्रमुखाला निवेदन देण्यात आले. परंतु या नियोजनशून्य कारभारामुळे या गोष्टीकडे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांसह विद्यार्थी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याकरिता ही बससेवा पुन्हा पूर्ववत करावी, अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक अनंतकुमार खरात यांच्यासह विद्यार्थी व गावकर्यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांसह उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.