देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याची शासनाकडून आदेश आहे. मात्र असे असताना देखील व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना कॅश उपलब्ध नाही, असे सांगून सहा ते सात दिवसांचे धनादेश दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे 24 तासाच्या आत आरटीजीएसने पेमेंट अदा करावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे हातपाल झालेल्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीच्या प्रशासनाच्या अनैतिक धोरणांमुळेदेखील मोठा फटका बसत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक तर आधीच बाजारात शेतमालाला अपेक्षित दर नाही, त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून कापूस विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच चुकारे या ठिकाणी दिले जात नाहीत. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शिवाय, शेतकऱ्यांना तात्काळ कॅश स्वरूपात कापूस विक्रीचे पैसे लागत असेल तर व्यापारी दहा टक्के बटवा म्हणून रक्कम काटून घेतात. यामुळे शेतकऱ्याची एक प्रकारची आर्थिक लूट सुरू आहे. खरं पाहता शासनाकडून शेतमाल विक्री केल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना चुकारे दिले पाहिजे, असे आदेश आहे. मात्र सदर शासनाच्या आदेशाला येथील बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या खाजगी जिनिंग प्रेसिंग व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कापूस विक्री केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत आरटीजीएस ने चुकारे अदा करावे. असे आदेश कापूस खरेदीदारांना द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे,तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,रवी इंगळे,तालुका सचिव जहीर पठाण, कार्याध्यक्ष जनार्धन मगर, शहराध्यक्ष विजय खांडेभराड,आजमत खान,सुरेश कोल्हे,कारभारी देढे,अनिस शाह,शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, निलराज शिंगणे आदींनी केली आहे.