– तहसीलदार म्हणतात, आमचा काही संबंध नाही, लोकांनी फसू नये!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुक्यात निराधार योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगून निराधार ज्येष्ठ नागरिकांकडून कागदपत्रे गोळा केली जात असून, त्यांच्याकडून पैसेही उकळले जात आहेत. दुसरबीड, किनगावराजा, धानोरा गावांत असे प्रकार घडले असून, लाखो रूपयांची फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे. याबाबत सिंदखेडराजा तहसीलदारांना विचारणा केली असता, त्यांनी कानावर हात ठेवत, असे काम किंवा अर्ज गोळा करण्याचे काम कोणत्याही संस्थेला दिले गेल्याची माहिती आमच्याकडे नाही. लोकांनी फसू नये, अशी सूचना तहसीलदारांनी केली आहे. तोतयेगिरी करून लोकांना लुबाडणार्या टोळीचा पदार्फास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यामधील ग्रामीण भागातील लोकांना तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता व तुमच्या हक्काचा लाभ तुम्हाला घरपोच मिळावा, कोणतेही कष्ट पडू नये, याकरिता शासनाने आम्हाला आमच्या संस्थेला बुलढाणा जिल्ह्यातील हे काम दिले असून, या संदर्भातील सर्व माहिती सबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्हा कार्यालयाकडून तहसीलदार, तलाठी सर्व यांना दिल्यात देण्यात आल्या आहेत. आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची ही योजना मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, याचप्रमाणे तालुक्यामधील बरेच ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना भेटून संस्थेच्या कामाबद्दल माहिती देऊन आम्हाला सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या जातात, त्याचप्रमाणे गावोगावी आपल्या एजंटमार्फत अशा लोकांना जमा करून त्यांच्याकडून कागदपत्रे व लागणाऱ्या खर्चाकरिता सहाशे ते हजार रुपये पर्यंत रक्कम वसूल करून फसवणूक होत असल्याची अनेक सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे याबाबत या संस्थेच्या महिलांना विचारपूस केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तुम्ही याच्यात पडू नका, आमचे काम आम्हाला करू द्या, अशी समजसुद्धा काही लोकांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यामधील दुसरबीड, किनगाव राजा, धानोरा या गावांमध्ये निराधार यांना निराधारची पगार मिळवून देण्याकरिता आमच्यामार्फत कागदपत्रे जमा करून लागणारा खर्च आमच्याकडे द्या, व आम्ही तुम्हाला तुमची पगार सुरू करून देऊ, असे सांगून सर्वांना एकत्र करून हा शासनाकडून कॅम्प आहे. यामध्ये तुमचे काम होईल, असे सांगून कागदपत्रे जमा करून व लागणाऱ्या खर्चाची सहाशे रुपये ते 1000 रुपये पर्यंत रक्कम जमा करून घेऊन फसवणुकीचा धंदा सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत वीर तानाजी मालुसरे बहुउद्देशीय संस्था साखळी या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून एका महिलेकडून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेली प्रमाणपत्र दाखविले जात असून, 24. 11. 2020 रोजीचा शासनाकडून सर्व तहसीलदारांना वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी गृहीत धरण्यात यावी, असा एक आदेश पत्र दाखवून व या संस्थेला काम दिल्याबाबत जिल्हा संजय गांधी निराधार योजनेच्या पत्राचा दाखला दिला जात आहे. अशी सर्व कागदपत्रे दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, हे फार मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बरीच लोक बोलत असून, या महिला गावोगावी जाऊन अशा प्रकारची निराधार योजनेची कॅम्प घेऊन लोकांची फसवणूक करत असाव्यात, असा संशय निर्माण झालेला आहे. याबाबत संबंधित तहसीलदार सिंदखेडराजा अनेक लोकांनी फोनद्वारे माहिती दिली असून, कार्यालयाकडून कोणतीही आजपर्यंत कारवाई न झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरबीड येथील देवीच्या मंदिरावर अशाच प्रकारचा निराधार योजनेच्या लाभार्थ्याचा कॅम्प घेऊन त्यांची कागदपत्रे घेऊन व खर्चा करता लागणारी पैसे घेऊन या लोकां ची दिशाभूल करण्याचा व फसवणूक करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याबाबत तुम्ही कुणाला जास्त बोलल्यास तुमचे काम होणार नाही तुमचेच नुकसान होईल, असे सूचनासुद्धा देण्याचे काम या महिला करतात. या प्रकाराबाबत सिंदखेडराजा तहसीलचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता आमच्याकडे शासनाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही संस्थेला काम दिल्याचे सूचना वगैरे नाहीत व जे घेण्यात येत असलेल्या कॅम्प बाबत यांचा कोणताही संबंध नाही. आमच्याकडे असे लोक कोणते प्रकारचे अर्ज सुद्धा आणून देत नाही. त्यांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये, असे सांगण्यात आले. या लोकांनी किनगावराजा, धानोरा व इतर गावांमध्ये जाऊनसुद्धा लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे सर्वत्र चर्चा असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून तोतयागिरी करणाऱ्या ठगांचा बंदोबस्त करावा, व होत असलेली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.