Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesMaharashtraVidharbha

शेतकर्‍यांचा ढाण्यावाघ बळीराजांची फौज घेऊन मंगळवारी नागपूर विधिमंडळावर धडकणार!

– बळीराजांच्या फौजेची उद्या फर्दापूर टोलनाक्यावरून नागपूरकडे कूच; सरकारच्या पायाखालची वाळू सरकारणार्‍या आंदोलनाची शक्यता!

बुलढाणा/चिखली (बाळू वानखेडे/कैलास आंधळे) – येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, पीकविम्याची १०० टक्के फायनल रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे लढवय्ये नेते, शेतकर्‍यांचे पंचप्राण रविकांत तुपकर हे गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून, राज्य व केंद्र सरकारने त्यांना शब्द देऊनदेखील अद्याप शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी तेथील नेते संसदेत आवाज उठवत असल्याने केंद्र सरकारने तातडीने माघार घेत उसापासून निर्मित इथेनॉलवरील बंदी उठवली, परंतु बुलढाण्याच्या खासदारांसह विदर्भातील खासदारांनी ऊस, सोयाबीनप्रश्नी मूग गिळले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात मागण्यांच्या पूर्ततेचे दान पडावे, यासाठी तुपकरांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याचा निर्णय घेतला असून, गावोगावातून शेतकर्‍यांची फौज उद्या नागपूरकडे रवाना होणार आहे. शेतकर्‍यांचा हा उद्रेक राज्य सरकारच्या उरात धडकी भरविणारा ठरेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.

येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, पीकविम्याची १०० टक्के फायनल रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. एल्गार रथयात्रा, २० नोव्हेंबररोजी बुलढाण्यात झालेला एल्गार महामोर्चा, सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकर्‍यांनी दिलेली धडक, यामुळे राज्य सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरीहिताचे या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे व वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन सरकारच्या वाट्याच्या मागण्यांची पूर्तता करू, असेही ठरले होते. परंतु, सरकारमधीलच एक गट सातत्याने तुपकरांना विरोध करण्याच्या भूमिकेतून शेतकरीहिताच्या आड येत असून, या गटाच्या नतद्रष्टेपणामुळेच केवळ तुपकरांना श्रेय जाईल, या कुहेतूने मदतीची ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्तेतील या गटाच्या आडकाठीमुळे स्वतः फडणवीस हेदेखील वैतागलेले आहेत, असे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे फडणवीस यांनी सरकारच्यावतीने शब्द देऊनही सत्तेतील या गटामुळे फडणवीस यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली असून, पीडित शेतकर्‍यांना नागपूर विधीमंडळावर धडक देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची दुर्देवी वेळ आली आहे.
वास्तविक पाहाता, सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ९ डिसेंबररोजी झालेल्या बैठकीत सर्व मुद्दे स्पष्ट झाले होते. राज्य पातळीवरील मागण्यांबाबत राज्य सरकार तर केंद्र पातळीवरील मागण्यांबाबत केंद्र सरकार निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देणार होते. बहुतांश बाबतीत सरकार सकारात्मक असल्याचे याच बैठकीत केंद्रीय मंत्री गोयलांनी सांगितले होते. त्यामुळेच शेतकरीहिताच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी रविकांत तुपकरांनी राज्य व केंद्र सरकारला १५ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत संपली पण राज्य अथवा केंद्र सरकारने अद्याप शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरवात केली नाही. केवळ तुपकरविरोध हेच या मागचे प्रमुख कारण असल्याचे दुर्देवी चित्र पुढे आले आहे. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार उद्या, १८ डिसेंबररोजी समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळील फर्दापूर टोल येथून दुपारी १२ वाजता शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होणार असून, १९ डिसेंबररोजी सकाळी ९ वाजता अधिवेशनावर ‘हल्लाबोल’ आंदोलन करणार आहेत. दिलेला शब्द न पाळणार्‍या केंद्र व राज्य सरकारचे शेतकरीहितांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले आहे.


गावोगावीचे शेतकरी तरूण एकवटले; नागपूर विधीमंडळावर धडक देण्यासाठी सज्ज!

राज्य व केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहात असल्याने, व अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकर्‍यांवर जहर खाण्याची वेळ आल्याने गावोगावीचे तरूण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पाठीमागे एकवटले आहेत. बळीराजाच्या या तरूणाईची मोठी फौज उद्या नागपूर विधिमंडळावर  धडक देण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्‍यांना तातडीने दिलासा दिला नाही तर बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र भयावर रूप धारण करेल. आम्ही राजकीय पक्ष, विचारधारा बाजूला सारून शेतकरी म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पाठीमागे उभे राहात आहोत. ज्या मिसाळवाडी गावाने या राज्याला आदर्श पत्रकार-संपादक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक नेते, शिक्षण व सिनेमा क्षेत्रातील दिग्गज दिले आहेत, त्या आदर्शगाव मिसाळवाडीतील एक अन एक तरूण उद्या नागपूरला जाणार असल्याचे मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतकरीपुत्र या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मेहकरकडे रवाना झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘सरकारचे पोलिस व गुप्तचर यंत्रणा अंदाज लावू शकणार नाही, इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी हे तुपकरांच्या विधिमंडळावरील धडक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी एखाद्या नतद्रष्ट्या सत्ताधारी गटाने वेगळ्या मार्गाने हे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न केला तर मोठा शेतकरी उद्रेक आणि राजकीय पेच निर्माण होऊन, त्याचे हादरे केंद्रातील मोदी सरकारलादेखील बसेल, असे वास्तवदर्शी चित्र आहे.’
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!