सोलापूर (हेमंत चौधरी) – भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे सहकार मंत्री असताना पदाचा गैरवापर करून विविध राष्ट्रीय महामार्गावरील शेतकर्यांच्या जमिनी मुलाच्या नावे घ्यायला लावून कोट्यवधी रूपये कमाविले असल्याची तक्रार महाराष्ट्राच्या लोक आयुक्ताकडे करण्यात आल्याची माहिती देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील तक्रारदार रविराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कदम म्हणाले, की सुभाष देशमुख यांनी सहकार मंत्री असताना २०१६- २०१७ मध्ये सांगली रोड, अक्कलकोट रोड, उस्मानाबाद रोड, सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शेतजमिनी मुलगा रोहन देशमुख यांचे सहकारी त्यावेळचे राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांना लोकमंगल उद्योग समूहातील विविध कंपन्यांच्या नावे बाजारभावापेक्षा कमी दराने विकत घ्यायला लावल्या. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. या जमिनीचा काही भाग महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी गेल्याने भरपाईतून त्यांना पैसे मिळाले. त्यामुळे देशमुख यांनी मंत्रीपदाचा गोपनीयतेचा भंग करून पदाचा गैरवापर केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान, महसूल व वनविभागाकडून अहवाल मागून या प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार आमदार देशमुख यांची चौकशी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार येईल, अशा प्रकारचे पत्र लोक आयुक्त कार्यालयाने दिल्याचे कदम यांनी सांगितले.