BuldanaBULDHANACrimeKhamgaonVidharbha

भरदिवसा गोळीबार; एक ठार, महिलेसह तिघे गंभीर जखमी

– उसणवारीच्या पैशातून, की अवैध शस्त्रविक्रीच्या वर्चस्वातून झाला दोन गटात राडा व गोळीबार?

खामगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील रोहणा-निमकोहळा रस्त्यावरील एका पाड्यात अंदाधुंद गोळीबाराची थरारक घटना घडली असून, या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला असून, महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि.७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. उसणवारीच्या पैशातून ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी, अवैध शस्त्रविक्रीच्या वर्चस्वातून दोन गटात राडा झाल्यानंतर एकमेकांवर गोळीबार करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रूग्णालयात हलवले असून, आरोपी पळून गेले असून, अधिक तपास कसोशीने सुरू आहे.

Buldhana Rohana News

खामगाव तालुक्यातील रोहणा निमकोहळा रस्त्यावर पारधी पाडा आहे. या पाड्यातील एका कुटुंबियांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पेनसावंगी येथील राजू सोनू भोसले यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी तीन लाख रूपये उसणे दिले होते. उसणवारीचे पैसे घेण्यासाठी राजेंद्र सोनू भोसले आणि त्यांची पत्नी अनिता भोसले गुरूवारी रोहणा येथे आले. त्यानंतर पारधी तांड्यात गेले. यावेळी त्यांचा वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन, छर्‍याच्या बंदुकीचा वापर झाल्याने, एकाचा जागीचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक आणि जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला असून, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
दरम्यान, खासगी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रोहणा गावात आज पारधी समाजातील दोन गटात हा तुफान राडा झाला. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाल्यानंतर या वादात तिघांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. ज्यामधील एकाचा मृत्यू झाला. घटनेत एक महिलाही जखमी झाली असून, त्यांच्यावर सध्या खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेतली. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!