पंजाब सरकारने शहीद अग्निवीरांच्या कुटुंबीयांना एक कोटी दिले; राज्य सरकारने फक्त 10 लाख!
– राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टवार यांनी शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या अग्निवीर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने केवळ १० लक्ष रूपयाची तुटपुंजी मदत देवून एकप्रकारे शहीदाच्या कुटुंबीयांचा अवमान केला असल्याची प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या पिंपळगांव सराई येथील घरी जावून कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वन केले. पंजाब सरकारने शहीद अग्निवीराला १ कोटी रूपये देवुन मदत केली, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुध्दा शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सागितले. यावेळी बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्यामभाऊ उमाळकर, संजय राठोड, अॅड. जयश्रीताई शेळके, जिल्हा सैनिक बोर्डाचे उबरहंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितीत पत्रकारांशी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, एकंकडे शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार तब्बल १ कोटी रूपयाची मदत देत असतांना, महाराष्ट्रासारखे प्रगतशील राज्य शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबीयांना केवळ १० लाख रूपये देवुन एकप्रकारे त्यांचा अवमानच करत आहे. सामान्य सैनिकांप्रमाणे अग्निवीरांकडुन सुध्दा देशसेवेची कामे करून घेतल्या जात असतांना सैनिक आणि अग्निवीरांमध्ये दुजाभाव निर्माण करण्याचे पातक कार्य महाराष्ट्र सरकार करत असून, केवळ अल्पवधीचे काळाचे प्रशिक्षण देवुन अग्निवीरांना लढाईसाठी सज्ज केले जाते. अशा प्रसंगी शहीद झालेल्या अग्निवीरांना सामान्य सैनिकांप्रमाणे शहीदाचा दर्जा देवुन त्या स्वरूपाची मदत का केली जात नाही, याचा आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. शहीद सैनिकांप्रमाणे अग्निवीर शहीदाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दयावी, उदरनिर्वाह करीता शेत जमीन सुध्दा उपलब्ध करून दयावी, असे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सागितले. गवते कुटुंबीयांशी चर्चा करतेवेळी गावातील मान्यवर मंडळीसह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांची तसेच गावक-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.