– राज्यातील ७३ वस्त्यांचा करणार विकास
– जिल्ह्यातील नांद्रा धांड़े व अमड़ापूर येथील वस्त्यांचा समावेश
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करत राज्यातील महायुती सरकारने नमो अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाची वस्ती सन्मान अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, याअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यातील ७३ वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत. जिल्ह्यातील नांद्रा धांड़े व अमड़ापूर येथील वस्त्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने महायुती सरकारने आता दलित मतांवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७३ व्या वाढदिवसानिमित्ताने विविध लोकोपयोगी उपक्रमाचा समावेश असलेला नमो -११ सूत्री कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. या अंतर्गत राज्यात नमो अनु.जाती व नवबौध्द घटकाची वस्ती सन्मान अभियान राबविले जाणार आहे. गाव/ वस्ती या विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून राज्यातील ७३ अनु.जाती व नवबौध्द घटकाच्या वस्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे विशेष अभियान राबविले जाणार आहे. सदर अभियानांतर्गत या वस्त्यांमध्ये रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देणे, सदर वस्त्यांमध्ये पक्के रस्ते बांधणे व प्रत्येक घरात वीजपुरवठा देणे, समाज प्रबोधनासाठी समाजमंदीर बांधणे, सदर वस्यामधील अनु.जाती व नवबौध्द घटकातील महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट व इतर माध्यमातून मदत करणे, प्रत्येक घरात जलजीवन मशीन अंतर्गत नळजोड़णी करणे, संपूर्ण स्वच्छता अभियानातून शौचालय बांधून देणे, सदर वस्त्यामथ्ये वृक्षलागवड़ व वृक्षसंवर्धन करणे, यासह विविध विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. याअंतर्गत ३६ जिल्ह्यातील ७३ वस्त्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.