भाजप पदाधिकार्यांनी पक्षाची लाज घातली; मेहकरात जोरदार राडा!
– एकाच तालुक्याला दोन अध्यक्ष दिल्याने दोन्ही गट एकमेकांना भिडले!
बुलढाणा / मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) – तालुकाध्यक्ष निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या दोन गटांत तुफान राडा झाल्याचा प्रकार आज (दि.०३) मेहकरात घडला. एकाच तालुक्यासाठी दोन दोन तालुकाध्यक्ष दिल्याने दोन गट समोरासमोर येऊन त्यांनी एकमेकांना लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी चांगलेच झोडपून काढले. एवढेच नाही तर भाजपचे विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश गवई यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच भाजप कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सभ्य लोकांचा पक्ष असे सांगणारे भाजपचे पायदेखील मातीचे निघाले असून, त्यांच्यातील अंतर्गत लाथाळ्या उघड झाल्याने भाजपचे जिल्ह्यात चांगलेच हसे सुरू आहे. या हल्ल्यात तिघांचे डोके फुटले आहेत. जखमी झालेल्या या कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निष्कासित केले आहे.
एकीकडे तीन राज्यांतील विधानसभा निकालाबद्दल भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत असताना मेहकरमध्ये याच पक्षातील दोन गटातील सदस्यांनी एकमेकांवर तुफान हल्ला करत रक्त सांडले. नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, अर्जुन वानखेडे यांच्यावर 20 ते 22 जणांनी हल्ला चढवला. भाजप विधानसभा संपर्क प्रमुखांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांनी पोलिस ठाणे गाठत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. मारहाण करणार्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी या प्रकारचे व्हिडीओही शूट केले. हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेमुळे मेहकर शहरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी नोंदवून घेतल्या असून, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे मेहकर पोलिसांनी सांगितले.
मेहकर येथे विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश गवई यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार होती. त्यापूर्वी प्रल्हाद अण्णा लष्कर आणि शिव ठाकरे यांच्यासह २० ते २५ लोकांनी प्रकाश गवई आणि अर्जुन वानखेडे, सारंग माळेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. हल्ला करणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकार्यांना बेदम मारहाण केली. तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून हा वाद पेटलेला असून, या वादाचे रूपांतर आज एकमेकांवरील हल्ल्यात झाले आहे. गवई यांच्यावर रॉडने हल्ला झाला असून, त्यांना शिवीगाळही करण्यात आली. यावेळी २० ते २५ जणांचा जमाव एकमेकांना चांगलाच बुकलून काढत होता. सर्वच जण जवळपास रक्तबंबाळ झाले होते. एका पदाधिकार्याच्या तर कानशिलात वाजवून त्याचे चांगलेच कान गरम करण्यात आले. पदाधिकार्यांमधील वाद चिघळल्याच्या या प्रकरणाबाबत स्थानिक नेत्यांनी प्रदेश पातळीवर माहितीही कळविली आहे.
—————
Photo courtesy : sarkarnama