Breaking newsBuldanaBULDHANAPolitical NewsPoliticsVidharbha

शेतीपिकांची नुकसान भरपाई महिनाभरात मिळणार!

– शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा
– सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीकडे मुख्यमंत्र्यांसह अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांनी फिरवली पाठ!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – शेतीपिकांची नुकसान भरपाई महिनाभरात देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना देत, त्यांचे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्वतःच्या हाताने चहा-बिस्कीट भरवून सोडवले. शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी तुपकरांनी केलेल्या आंदोलनाला अंशात्मक यश आले असून, राज्य सरकारच्या अख्त्यारित असलेल्या मागण्या लगेचच, तर केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या मागण्या १५ दिवसांत मान्य करून, शेतकर्‍यांना लाभ देण्याची ग्वाही फडणवीस यांनी तुपकरांसह शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिली. मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्यासाठी आलेल्या तुपकरांसह शेतकर्‍यांचे समाधान झाल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचीही घोषणा केली. या बैठकीदरम्यान फडणवीसांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा तणाव स्पष्टपणे दिसत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तथापि, राज्याचे सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मात्र या बैठकीला हजर होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तथा राज्य सरकारचे सचिव श्रीकर परदेशी, तुकाराम मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. विशेष बाब म्हणजे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याची घोषणादेखील या बैठकीत फडणवीस यांनी करून, या महामंडळामार्फत शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आजाराचा खर्च उचलला जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत रविकांत तुपकरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत दिल्लीत बैठक बोलावली जाणार असून, या बैठकीला रविकांत तुपकरदेखील उपस्थित राहणार आहेत. सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्या पंधरा दिवसांत काही मागण्या महिनाभरात मार्गी लावण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविकांत तुपकर यांना दिली आहे. तुपकरांच्या आंदोलनाचे हे मोठ यश मानले जात आहे. मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आज (दि.२९) यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे मुंबईत धडक दिली. तर तुपकर व शेतकर्‍यांचा ताफा रस्त्यात असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्यावतीने तुपकरांना चर्चेचे निमंत्रण दिले आणि त्यानुसार तुपकरांसह एकूण २२ जणांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चर्चेसाठी पोहोचले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय कुटे तसेच सचिव श्रीकर परदेशी, तुकाराम मुंडे, अनुप कुमार यांच्यासह विविध विभागाचे दहापेक्षा जास्त सचिव उपस्थित होते. यावेळी तुपकरांनी आपल्या सर्व मांगण्या मांडल्या. दोन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असून, पंधरा दिवसांत या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही तुपकरांना दिली.
या बैठकीत फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला, व सोयाबीन-कापूस दरवाढ प्रश्नाबाबत येत्या आठ दिवसांमध्ये बैठक लावण्याबाबत विनंती केली. ती गोयल यांनी मान्य करत, बैठकीचे निमंत्रण दिले. फडणवीस यांचा स्पीकर मोडवर असल्याने ही चर्चा तुपकरांसह उपस्थित सर्वांनी ऐकली. फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ या बैठकीला जाणार असून, यामध्ये रविकांत तुपकरांचादेखील समावेश राहणार आहे. सोयापेंडीची आयात थांबवून निर्यात करावी, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापूस व सुत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, तेलबियांवरील जीएसटी रद्द करावा, जीएम सोयाबीन व कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळावी, सोयाबीन-कापसाच्या वायदेबाजावरील बंदी उठवावी, कृषीकर्जावरील सीबीलची अट रद्द करावी, या केंद्र शासनाशी संबधीत असलेल्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. तर राज्य शासनाच्या अख्त्यारित असलेल्या बहुतांश मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करुन येत्या १५ दिवसांत यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीला रविकांत तुपकरांसह अ‍ॅड. शर्वरी तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले, लक्ष्मी झगरे, विनायक सरनाईक, अमोल राऊत, श्याम अवथळे, अमित अढाव, नारायण लोखंडे, विशाल गोटे, विठ्ठलराजे पवार, राजेंद्र मोरे, भारत वाघमारे, दत्तात्रय जेऊघाले, नितीन राजपूत, जितू अडेलकर, समाधान गिरी आदी उपस्थित होते.
सोयाबीन-कापसाला चांगला दर द्यावा, राज्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट एकरी १० हजार रुपये द्यावी, पीक विम्याचा लाभ मिळावा, आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. सरकारच्यावतीने शेतकर्‍यांसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा, मंत्रालयाचा ताबा घेण्यात येईल, असा इशारादेखील तुपकरांनी दिला होता. त्यानंतर काल ते शेतकर्‍यांच्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. तुपकरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले की, सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्या पंधरा दिवसांत, काही मागण्या महिनाभरात मार्गी लावण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. सोयाबीन-कापूस दरवाढ प्रश्नाबाबत आठ दिवसांत दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक होणार आहे. तर राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून पंधरा दिवसांत काही तर महिना भरात काही मागण्या मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आपण सरकारला पंधरा दिवसांचा अवधी देत आहोत, पंरतु या काळात सरकारने दिलेला शब्द पुर्ण नाही केला तर नागपूर अधिवेशनावर धडक देऊ, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.


या मागण्याही झाल्या मंजूर…

राज्य सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. दुष्काळाची मदत, येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई महिनाभरात शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार असून, ही मदत वाढवून देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर केले. गेल्यावर्षीच्या व यावर्षीच्या पीकविम्याची अग्रीम आणि फायनल रक्कमदेखील महिना भरात शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची त्यांनी ग्वाही दिली. जळगाव जामोद, संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्यांमध्ये ढगफुटीने झालेल्या नुकसानीची मदत आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार, दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत देखील सरकार सकारात्मक असून नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍याच्या खात्यात ५० हजार रुपये जमा होतील, असाही शब्द ना. फडवणीस यांनी दिला. जंगली जनावरांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी शेतीला मजबूत कम्पाऊंड करण्यासाठी नवीन योजना आणणार, दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज देणार, बँकांनी अनुदानावर होल्ड लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करुन देण्याबाबत नागपूर अधिवेशनात निर्णय घेणार, शेतकर्‍यांना पूर्णवेळ वीज देण्याबाबत नवी योजना आखणार, शेतरस्ते, पांधण रस्त्यांच्या निर्मितीसाठी नवी सुटसुटीत योजना आणणार, महिला बचत गटांच्या कर्जाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


शेतकर्‍यांसोबत घेतला पहिला घास!

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सर्व सकारात्मक चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांना बिस्कीट खाऊ घालत अन्नत्याग आंदोलन सोडवले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी पनवेलजवळ थांबलेल्या दोन हजार शेतकर्‍यांजवळ पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यासोबत जेवण करुन शेतकर्‍याच्या हाताने पहिला घास खात पाच दिवसांपासून सुरु असलेले आपले अन्नत्याग आंदोलन सोडले.
————

फडणवीसांकडून तुपकरांना चर्चेचा कॉल!

https://fb.watch/oDe_6P4X7k/https://fb.watch/oDe_6P4X7k/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!