अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती ढासाळली!
– तुपकरांच्या आंदोलनावरून सरकारमध्येच दोन गट; फडणवीस तणावाखाली?
मुंबई (खास प्रतिनिधी) – सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकर्यांचे पंचप्राण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांच्या किडनीवर सूज आली आहे; तसेच त्यांचा रक्तदाब व रक्तातील साखरेची पातळीदेखील कमी झालेली आहे. कालच, त्यांना चक्कर आल्यामुळे तातडीने मुंबईतील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सद्या डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुपकरांना विनाकारण महत्व देत असल्याचा आक्षेप घेत, ‘आम्ही राजकीय करिअर पणाला लावले आहे, परंतु तुपकरांमुळे ते धोक्यात आले आहे’, अशी बडबड जिल्ह्यातील एक नेता करत असल्याची माहिती असून, तुपकरांवरून सरकारमध्ये दोन गट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. कालच्या बैठकीवरूनही या दोन गटांत कमालीचा संघर्ष झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून, त्यामुळेच भरबैठकीत फडणवीस यांच्या चेहर्यावर कमालीचा तणाव स्पष्टपणे दिसत होता.
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सलग पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले. तर २८ नोव्हेंबररोजी मुंबई मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू ठेवून हजारो शेतकर्यांसह तुपकरांनी मुंबईत धडक दिली. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले गेले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे दि.२९ नोव्हेंबररोजी जम्बो बैठक पार पडली, या बैठकीत रविकांत तुपकरांच्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्यांच्या संबधी बहुतांश मागण्या मान्य झाल्या. सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी कर्जत येथे सोबत आलेल्या हजारो शेतकर्यांच्या साक्षीने महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी खाऊन आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. परंतु सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांचे ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल कमी झाली आहे. तर किडनीवर परिणाम झाला असून, क्रियेटीन वाढले आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबररोजी मध्यरात्री त्यांना उपचारासाठी मुंबईतील (चर्नी रोड) सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीतच तुपकरांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. दोघांनी धरून त्यांना उठवले व बसवले होते. तुपकरांची खालावलेली प्रकृती पाहाता, फडणवीसांनी भरबैठकीतच त्यांना चहा-बिस्कीट खाऊ घालून तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सोडवले होते.
————-