BuldanaBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

रब्बीपिके, फळबागांवर ‘अवकाळी’चा नांगर; जिल्ह्यातील एक लाख एकरातील पिके उद्ध्वस्त!

– कपाशी, तुरीसह रब्वी पिके झोपली, फळबागाही झोड़पल्या!

– सत्ताधारी सत्तेत मश्गुल; विरोधकांचे तोंड़ावर बोट; शेतकरीनेते गुंतले आंदोलनात; शेतकर्‍यांचा वाली कोण?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्हा झोड़पून काढला आहे. वादळ व गारांसह पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ०९५ हेक्टर अर्थात एक लाख एकरांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक व अंदाजित अहवाल कृषी विभागाचा आहे. यामध्ये कपाशी, तूर, रब्बीपिकांसह सह फळबागा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला. विशेष म्हणजे, अमरावती विभागात सर्वांत जास्त नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे. त्यातही मेहकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंददेखील झाली असताना कृषी व महसूल विभागाने मात्र मेहकर तालुका वगळला, चिखलीत फक्त भाजीपाला पिकांचे नुकसान दाखवले तर तीन तालुक्यांत नुकसानच नाही, असा अहवाल दिल्याने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासन निव्वळ कागदी घोडे नाचवत असताना, सत्ताधारी सत्तेत मश्गुल असून, विरोधकही बोलायला तयार नाहीत. शेतकरी नेते आंदोलनात गुंतले असल्याने आमचा वाली कोण? असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहे.
चिखली तालुक्यातील आदर्श गाव मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांच्या शेतीचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान.

गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने खरिपाची पिके हातातून गेलीत तर अवकाळीने रब्बीचेही पीक हिसकावून नेले. यामध्ये खरीप २०२२ च्या नुकसानीची मदत एकरी बाराशे रूपये देऊन शासनाने शेतकर्‍यांची थट्टा केली, तर अवकाळीच्या नुकसानीची मदत अजूनही बहुतांश भागात मिळाली नाही. सदर मदतीसाठी शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी सीएससी सेंटरवर चकरा मारत असल्याचे दिसत आहेत. ही मदत महिन्यातून दुसर्‍या व चौथ्या शुक्रवारी अर्थात दर पंधरा दिवसांनी खात्यात जमा करण्यात येत असल्याचे महसूल प्रशासनाकड़ून सांगण्यात येते. गेल्या २६ नोव्हेंबरपासून तीन दिवस धो धो अवकाळी पाऊस कोसळला. या वादळी व गारासह पावसाने जिल्ह्यात ३६ हजार ०९५ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून, कपाशी, तूर, रब्बीसह फळबागा, भाजीपाला, पिकांचे तसेच शेड़नेट व हरितगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १५ गावे मका ६५ हेक्टर, चिखली ८ गावे भाजीपाला १० हेक्टर, मलकापूर ७८ गावे तूर, कापूस हरभरा, गहू, भाजीपाला १९६१ हेक्टर, खामगाव तालुका ८ गावे ऊस, संत्रा, केळी, भाजीपाला ४० हेक्टर, नांदुरा तालुका १५३ गावे कापूस, तूर, फळपीक १० हजार ६७० हेक्टर, संग्रामपूर तालुका २ गावे टोमॅटो, मिरची २१ हेक्टर, लोणार तालुका ४५ गावे तूर ७६०० हेक्टर, शेड़नेट व हरितगृह ३४.७० हेक्टर, देऊळगावराजा तालुका १८ गावे फळपिके, रब्बी ज्वारीच्या, भाजीपाला ७६१० हेक्टर, शेड़नेट व हरितगृह ४७.२० हेक्टर व सिंदखेड़राजा तालुक्यातील ५४ गावातील गहू, भाजीपाला, कांदा, फळपिके ७९८५ हेक्टर तर शेड़नेट व हरितगृहाचे ५१ हेक्टर असे ३६ हजार ०९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक व अंदाजित अहवाल कृषी विभागाचा असला तरी नुकसान मात्र जास्त आहे. यामध्ये मोताळा, शेगाव, जळगाव जामोद व मेहकर तालुक्यात अवकाळी पावसामुळे काहीच नुकसान झाले नाही, असे धांदात खोटे चित्रही या अहवालात रेखाटले गेले आहे. विशेष म्हणजे, यातील मेहकर तालुक्यात तर अतिवृष्टीची नोंददेखील झाली आहे. बुलढाणा, चिखली, संग्रामपूर व खामगाव तालुक्यातही मोठे नुकसान झाले असताना महसूल प्रशासनाने टेबलावर बसून निव्वळ खोटे पंचनामे चालवले असल्याचे दिसते आहे. पुढील सर्व्हेतून प्रत्यक्ष नुकसानीचा आकड़ा समजेलच पण काही तालुक्यात नुकसानच नाही, असे दाखविल्याने हे सर्व्हेक्षण नुसता फार्स ठरणार का ? याचीही चिंता शेतकर्‍यांना सतावते आहे. निसर्गाने मारले व प्रशासनेही झोड़पले तर जावे कोठे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सतावत आहे.


याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांना विचारले असता, सदर नुकसानीची आकड़ेवारी संबंधित तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालयाकड़ून दिली जात असून, हा प्राथमिक व अंदाजित अहवाल असल्याचे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव हे सर्वप्रथम बांधावर पोहोचून शेतकर्‍यांना धीर दिला. परंतु, होमपीच असलेल्या मेहकर तालुक्यात नुकसानच नसल्याचा अहवाल असल्याने याचा आढावा घेणेदेखील गरजेचे आहे. अजिबात नुकसान दाखवले नाही, अशा तालुक्यांत मेहकरसह जळगाव जामोद, शेगाव, मोताळा या तालुक्यांचा समावेश असून, चिखलीत फक्त भाजीपाला पिकांचे नुकसान दाखवले आहे. तर मलकापूर, खामगाव या तालुक्यांत मात्र नुकसान झाल्याचे प्रशासनाने अंदाजीत केले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!