Breaking newsBuldanaHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

फडणवीसांकडून तुपकरांना चर्चेचा कॉल!

– मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची बळीराजाच्या फौजेसह मुंबईकडे कूच!

मुंबई/बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेतील एका गटाचा विरोध झुगारून पुढाकार घेतला असून, बुधवारी (दि.२९) दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तुपकरांशी चर्चेच्या अनुषंगाने रविवारीच वरिष्ठ अधिकार्‍यांनी नोट तयार केली होती. तुपकरांसह शेतकर्‍यांनी ठरल्याप्रमाणे मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्यासाठी मुंबईकडे कूच केली असता, सरकारमधील एका घटकाने पुन्हा आततायीपणा करण्याचा प्रयत्न केला होता. तुपकरांना अटकाव करून रूग्णालयात दाखल करण्याचे नियोजन पुढे आले होते, अशी गोपनीय माहिती मिळाली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात मध्यस्थी करत, तुपकरांशी चर्चेचे दरवाजे खुले केले, व तुपकर हे शेतकरी चळवळीतील महत्वाचे नेते आहेत, शेतकरीहिताची भूमिका घेऊन ते येत असतील तर त्यांचे आंदोलन मोडित काढण्याची भूमिका सरकार घेऊ शकत नाही, असे सत्तेतीलच एका गटाला फटकारले असल्याचेही खात्रीशीर वृत्त गोपनीय सूत्राकडून कळले आहे.

चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग करीत असलेल्या शेतकरी नेते तुपकर यांनी मंगळवारी (दि. २८) शेतकर्‍यांसह मुंबईकडे कूच केली. तुपकर यांचा प्रवास सुरू होताच, त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले. शेतकरीहितासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या तुपकर यांनी बुलढाण्यातील महाएल्गार मोर्चादरम्यान सरकारला आठवडाभराची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आपल्या भूमिकेवर ते सुरुवातीपासूनच ठाम होते. त्यामुळे बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांची अटक करण्याची पद्धत चुकीची असल्याचे नमूद करीत न्यायालयाने तुपकर यांची त्याच दिवशी जामिनावर मुक्तता केली होती. न्यायालयातून बाहेर येताच तुपकर यांनी सोमठाणा या आपल्या मूळगावी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. शेतकरी नेते सदाभाऊ खोत, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह विविध नेत्यांनी व संघटनांनी तुपकर यांना पाठिंबा दिला होता. अशात ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी तुपकर हे शेतकर्‍यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे निघाली असता, जांब येथे शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व सर्व आंदोलकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी विंचनकर, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, चिखली ठाणेदार संग्राम पाटील, धाड ठाणेदार मनोज गावंडे यांनी रविकांत तुपकरांची भेट घेऊन शासनाच्यावतीने चर्चेचे लेखी निमंत्रणाचे पत्र दिले. आपण चर्चेस तयार आहोत. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, त्यानंतर आपण आपले आंदोलनाची भूमिका करणार आहोत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतीलच व माझे अन्नत्याग ही चालू राहील, असे रविकांत तुपकर यांनी प्रशासन व सरकारला कळविले. त्यानंतर शेतकऱ्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.

आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत, वेळ पडली तर आम्ही तुमच्यासाठी मुंबईला येवू – जरांगे पाटलांचा तुपकरांना फोन

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा अवस्थेतही त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. जीवाची पर्वा न करता तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी तुपकर यांच्याही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सोबतच प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी रविकांत तुपकरांना दिला.

रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यासाठी त्यांच्या काही निकटवर्तीयांनी त्यांना तुपकरांच्या मागण्या व भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी तुपकर व शेतकर्‍यांना चर्चेसाठी बोलावले. यासंदर्भातील पत्र बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने प्रवासात असलेल्या तुपकरांना दिले. सरकारने चर्चेसाठी बोलावल्याबद्दल तुपकर यांनी समाधान व्यक्त केले. बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तुपकर व त्यांचे शिष्टमंडळ यांच्याशी देवेंद्र फडणवीस हे चर्चा करून मार्ग काढणार आहेत. आमचे कोणत्याही नेत्याशी किंवा सरकारशी वैर नाही. आम्ही शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी लढत आहोत. शेतकरी अडचणीत आहे, हे सरकारने समजून घेतले पाहिजे, असे तुपकर म्हणाले. सरकारशी चर्चा पूर्ण होत नाही आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नाही, तोपर्यंत अन्नत्याग कायम राहणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. दरम्यान, तुपकरांना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनीदेखील फोन करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला, तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूसदेखील केली. आता बुधवारी सरकारसोबत तुपकरांची काय चर्चा होते, याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागून आहे.


सरकार सकारात्मक असले तरी, तुपकरांनीही संयमाने घ्यावे, आडमुठी भूमिका टाळावी!

राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या शेतकरीहिताच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरीवर्गासाठी नुकसानभरपाईची मदत सरकार जाहीर करू शकते. तसेच, पीकविम्याची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यास सरकार अनुकूल आहे. परंतु, तुपकरांनी तुटेपर्यंत ताणू नये, अशी अपेक्षा सरकारमधील काही महत्वाचे नेते खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलनाआडून तुपकर हे आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचा डोळा लोकसभा निवडणुकीवर आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका सरकारमधील एका घटकाला बसणे निश्चित आहे. तुपकरांनी भाजपमध्ये यावे, अन् लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी भाजपचे काही नेते प्रयत्न करत आहेत, परंतु तुपकर हे ‘नाहीही म्हणत नाही, आणि होदेखील म्हणत नाही’. त्यामुळे भाजप नेतृत्वाने तुपकरांशी चर्चेचे प्रयत्न थांबवले आहेत. तुपकर हे एकाचवेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस या सर्वांशी संपर्क ठेवून असून, त्यांची भूमिकाही सर्वांसाठी ‘मी तुमचाच आहे’, अशा स्वरूपाची असते. सगळेच डगले एकाचवेळी वाजविण्याच्या नादात, सर्वच नेत्यांचा आता तुपकरांवरील राजकीय विश्वास उडू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून रविकांत तुपकरांना सत्तेतील एका गटाचा तीव्र विरोध असून, तुपकरांना विनाकारण महत्व देऊ नका. त्यांच्यासोबतची चार-दोन माणसे सोडली तर त्यांच्या पाठीमागे फार मोठी राजकीय ताकद नाही. आक्रास्ताळ आंदोलनाव्यतिरिक्त तुपकर फार काही करूही शकत नाही. त्यामुळे तुपकरांना अटक करून निवडणुका होईपर्यंत आत ठेवा, असा आग्रह तुपकरांच्या विरोधातील गट करत असल्याची चर्चा आहे. तथापि, शेतकरी चळवळ जीवंत राहिली पाहिजेत, त्यासाठी तुपकरांसारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे, तुपकर हे शेतकरीप्रश्नांवरील अभ्यासू नेतृत्व आहे, अशी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्यामुळे ते तुपकरांबाबत सॉफ्ट कार्नर ठेवून आहेत, अशी खात्रीशीर माहिती हाती आली आहे. बुधवारच्या चर्चेत तुपकरांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, पत्रकार आणि टीव्ही कॅमेरे पाहून आततायीपणा करून तुटेपर्यंत ताणू नये. ‘चर्चा फिस्कटू शकते व ही चर्चा फिस्कटली तर तुपकर स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता आहे’, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी. हे सरकार प्रत्येकवेळेसच आपल्यासमोर झुकेल, अशी भूमिका वारंवार ठेवणे योग्य नाही. आंदोलन यशस्वी झाले, असा मेसेज जाईल, अशी सोय करता येईल, अशी भूमिकाही ज्येष्ठ नेते खासगीत बोलताना व्यक्त करताना दिसत होते.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!