Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार व तुपकरांमधील संघर्ष चिघळणार?

– चिखली तालुक्यातील सोमठाणा बनले शेतकरी आंदोलनाचे केंद्र
– दुसर्‍या दिवशीही जिल्ह्यात ठीकठिकाणी आक्रमक आंदोलने

सोमठाणा, ता. चिखली (बाळू वानखेडे) – राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार व शेतकर्‍यांचे पंचप्राण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातील सोयाबीन-कापूस दरवाढ व शेतीपिकांच्या नुकसान भरपाईवरून निर्माण झालेला संघर्ष चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे तुपकरांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा हे आपल्या आंदोलनाचे केंद्र बनविले असताना, दुसरीकडे ठरल्याप्रमाणे २९ तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी धडक देण्याचीही रणनीती आखली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मंत्रालय परिसरात सद्या जमावबंदी आदेश लागू असल्याने शिंदे सरकार व तुपकरांमधील संघर्ष चांगलाच पेटण्याची चिन्हे असून, तुपकर गनिमीकाव्याने आंदोलन करण्याची शक्यता पाहाता, मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या न्यायहक्कांच्या मागण्यांसाठी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचा दबाव झुगारून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज, २६ नोव्हेंबररोजी अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या आंदोलनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी हे चिखली तालुक्यातील सोमठाणा या आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. दुसरीकडे, राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यामुळे कोणत्याहीक्षणी हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २९ नोव्हेंबररोजी मिळेल त्या मार्गाने मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार पदाधिकारी व शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रूपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रूपये भाव मिळावा, चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी, या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी २८ नोव्हेंबररोजी सकाळी ९ वाजता हजारो शेतकर्‍यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार व २९ नोव्हेंबररोजी मुंबईत मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. त्यानंतर काल, २५ नोव्हेंबररोजी पोलिसांनी प्रचंड फौजफाट्यासह अचानक तुपकर यांच्या घरी धडक देत त्यांना बळजबरीने अटक केली. तुपकरांना पोलिसांनी भरताटावरून उठवले व त्यांना दोन घासदेखील खाऊ दिले नव्हते. पोलिसांच्या या अन्यायकारक कारवाईमुळे राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राज्यभरात आंदोलनांचा धडाका सुरू झाला. दरम्यान, रविकांत तुपकरांना सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकारांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूदेखील केले. जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पोलिसांनी केलेली चुकीची कारवाई आणि सरकारकडून आंदोलन दडपण्याचा होणारा प्रयत्न हे पाहता, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून, कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावना पाहता आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली आहे. चोर लुटारू आणि दोन नंबरचे धंदे करणारे गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहेत, असे लोक खुलेआम फिरत आहेत. परंतु पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाही तर दुसरीकडे सोयाबीन-कापसाला भाव मागणार्‍यांवर कारवाई केली जाते, हा कुठला न्याय? शेतकरी आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव आहे. परंतु आता शेतकर्‍यांची फौज मागे हटणार नाही. शेतकर्‍यांसाठी शहीद झालो तरी चालेल, परंतु आता मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेणारच असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तुपकर यांच्या आवाहनानुसार, गावा-गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज होत आहेत. तसेच राज्यभरातील कार्यकर्तेदेखील रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांच्या संतप्त भावना पाहता, हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.


सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्या सरकारने २८ नोव्हेंबरपर्यंत मान्य केल्या नाहीत, तर २९ नोव्हेंबररोजी हजारो शेतकरी मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेतील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. यावर शेतकरी ठाम असून, २८ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना होतील, व २९ नोव्हेंबरला म्ांत्रालयाचा ताबा घेतील, असे रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तुपकरांनी सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असले तरी, तुपकर हे गनिमीकाव्याने मंत्रालयावर धडक देतील, अशी शक्यता पोलिस व एकनाथ शिंदे सरकारला वाटते आहे. त्यामुळे सोमठाणा व मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात गुप्त पोलिस व खबरे यांचे जाळे सरकारने निर्माण केले असून, पोलिस प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. तुपकरांचे आंदोलन मोडित काढण्यासाठी जिल्ह्यातील एक नेता जीवाचा आटापिटा करत असल्याचे दिसत असून, त्याच्या मनसुब्यांवर मात्र पाणी फेरले जात असल्याचे दिसून येत आहे. तुपकरांचे आंदोलन जितके दिवस चालेल, तितका या नेत्याला आगामी निवडणुकीत राजकीय फटका बसणार आहे. दरम्यान, तुपकरांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात चर्चेसाठी ‘नोट’ तयार करण्याची घाई सुट्टीच्या दिवशीही चालू होती, अशी माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे. तुपकरांचे आंदोलन मोडित काढता आले तर ठीक, नाही तर चर्चेची तयारीदेखील सरकारने खासगीत सुरू केली असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या बातमीची सरकार वर्तुळात जोरदार चर्चा!

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक करून त्यांची रवानगी तुरूंगात करण्यासाठी कुणी आदेश दिलेत? तुपकरांच्या अटकेतून प्रशासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत आहे का? अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ‘फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?’ अशा मथळ्याखालीचे सडेतोड वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केले होते. या वृत्ताची बुलढाणा जिल्ह्यासह मंत्रालय वतुर्ळात उलटसुलट चर्चा आज दिवसभर रंगली होती. अनेकांना ही बातमी देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करणारी वाटली; पण त्यात काहीही तथ्य नाही. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ हे सडेतोड पत्रकारितेसाठी ओळखले जाते. दरम्यान, या वृत्ताची गृहमंत्रालयातील वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. लवकरच याबाबत चौकशी प्रस्तावित होण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. तसेच, तुपकरांच्याविरोधात सत्तेतील फक्त एक गट असल्याचेही या वृत्तातून अपरोक्षपणे अधोरेखीत झाले असून, भाजप व फडणवीस हे मात्र शेतकरी व शेतकरी चळवळीतील नेतृत्वाच्या बाजूने असल्याची बाबही या वृत्तातून ठळकपणे अधोरेखीत करण्यात आली होती. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या या भूमिकेचीही जनमाणसात उलट आणि सुलट अशी दोन्ही बाजूने चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी हे वृत्त वाचून ‘बातमी मागील बातमी’ जाणून घेतली तर अनेकांनी या वृत्तावर सोशल मीडियावर टीका केल्याचेही दिसून आले. लोकांच्या या दोन्ही भूमिकेबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सर्वांचे आभारही व्यक्त केले आहेत.

फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!