‘अवकाळी’ने रात्रभर झोडपले; कपाशी, तूरीसह रब्बीपिके, फळबागांची अतोनात नासाडी!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्याला रविवारी (दि.२६) रात्रभर अवकाळी पावसाने झोड़पून काढले. या अचानक व वादळी पावसामुळे कपाशी, तूर तसेच रब्बी पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यांवर संकटाचे ढग आणखी गड़द झाले आहेत. सिंदखेडराजा, देऊळगावराजा व लोणार या तालुक्यांत अतिवृष्टीसारखा पाऊस झाला, तर अन्य तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातदेखील झाला नाही इतका पाऊस काही तासांतच कोसळला. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव, आ. राजेंद्र शिंगणे हे आज सकाळी शेतीबांधावर पोहोचून त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी सूचना या दोन्ही नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात जेमतेम पाऊस झाला. त्यामुळे धरणेही भरली नाही तर पाऊसच नसल्याने ऐन हिवाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. येलो ेमोझॅकमुळे सोयाबीन पूर्णतः गेले तर कपाशी लाल्यामुळे नेस्तनाबूत झाली. याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने बातमी प्रकाशित केल्यानंतर व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागणी लावून धरल्यावर शासनाने जिल्ह्यातील ८२ महसूल मंड़ळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली पण घाटाखालील २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस नसलेल्या आठ महसूल मंड़ळे वगळता इतर मंड़ळात छदामही मदत दिली नसल्याची माहिती आहे. आपत्ती सुरूच असल्याने शेतकरी पुरता संकटात सापड़ला आहे. असे असताना २६ नोव्हेंबररोजी रात्रभर जिल्ह्यात वादळ व विजांसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे कपाशी, तूर, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, फळबागा तसेच वीटभट्ट्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषत मेहकर, खामगाव तालुक्यात या पावसाचा जोर जास्त होता. खामगावात तर दीड़ इंचापेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समजते. तसेच चिखली, सिंदखेडराजा, संग्रामपूरसह इतर तालुक्यातही पावसाचा जोर दिसला. एकीकड़े पावसाअभावी खरिपाचे पीक हातचे गेले असताना आता अवकाळी पावसामुळे कपाशी, तूर हे हाती आलेले पीक जाण्याची शक्यता बळावली आहे, त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता शासनाने अंत न पाहता झालेल्या नुकसानीची मदत तातड़ीने द्यावी, अशी रास्त मागणी शेतकरी करीत आहेत.
दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का, माळ सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन खा.प्रतापराव जाधव यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नेट शेड, भाजीपाला, तूर, गहू, हरभरा पिकांच्या शेतात पाणी साचलेले आहे तर कुठे गारांचा थर असल्याचे थर असल्याचे खा. जाधव यांनी सांगितले. दरम्यान खा. जाधव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना तातडीने आजच्या आज पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.