– पुढील दोन ते तीन दिवस आणखी अवकाळी पावसाचे; शेतीपिकांचे अतोनात नुकसान
नागपूर (वृषाली जाधव) – राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत, अशी माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शेतकर्यांना आवश्यक ती मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये गारपिटीचा अनेक पिकांना फटका बसला आहे. द्राक्ष, भात, नागली, तसेच तृणधान्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली. बुलढाणा, वाशिम, अकोल्यामध्ये गहू आणि तुरीसह इतर फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. परभणीमध्येही, ऊस, ज्वारी, हळद पिकांना दिलासा मिळाला असला तरी हरभरा, तूर पिकांसह वेचणीला आलेला कापूस भिजून गेला आहे. घरात पाणी शिरल्याने, साठवून ठेवलेल्या शेतमालाचेही नुकसान झाले आहे. आज सकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागानुसार, हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.