BuldanaHead linesVidharbha

पोलिसांनी तुपकरांना केली अटक, न्यायालयाने केली सुटका; जिल्हाभर शेतकरी उद्रेक!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन व कपाशी पिकाला भाव, पीकविम्याची रक्कम आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मागणार्‍या शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी शनिवारी दुपारी त्यांच्या घरी धाड घालून अचानक अटक केली. पोलिसांच्या हुकूमशाहीविरोधात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरीवर्ग चवताळून उठला होता. तुपकरांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची सुटका केली. दरम्यान, राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याने, तसेच शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी शेतकरी नेते तथा शेतकर्‍यांचे पंचप्राण रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचे लोण आता संपूर्ण राज्यभर पोहोचणार असून, राज्यातील एकनाथ शिंदे सरकारविरोधात सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यातही चोहीकडे शेतकरी उद्रेक पहावयास मिळाला असून, या आंदोलनाला हिंसक वळण मिळू लागले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना शनिवारी दुपारी एक वाजता त्यांच्या राहत्या घरून बुलढाणा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची सुटका केली. तुपकरांच्या अटकेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. बुलढाणा पोलिस ठाण्यासमोर शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले तर चिखली-खामगाव रोडवरील पेठ फाट्यावर टायर जाळून तुपकरांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला. बुलढाणा शहर पोलिस ठाण्यासमोर रविकांत तुपकरांचे समर्थक नितीन राजपुतांनी झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. देऊळगाव मही, डोणगाव येथे कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. रायपूर येथेही टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. खामगाव तालुक्यातही ठीकठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर ठीकठिकाणी कार्यकर्ते-शेतकर्‍यांकडून टायर जाळून, रास्तारोको करून रविकांत तुपकरांच्या अटकेचा निषेध केला गेला होता. तसेच, हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
—————

फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!