Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?

– मनोज जरांगे पाटलांनंतर रविकांत तुपकरांचे सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रशासनाचा मोठा कट असल्याचा संशय बळावला

पुरूषोत्तम सांगळे

मुंबई/बुलढाणा – शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिकात्मकरित्या मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर व कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी दिला होता. २९ तारखेला हे आंदोलन मुंबईत नियोजीत असताना तुपकरांना आजच धाड टाकून अटक करण्याचे आदेश बुलढाणा पोलिसांना कुणी दिले आहेत? तुपकरांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून त्यांची सुटका केली आहे. याचा अर्थ तुपकरांसारख्या शेतकरी नेत्याला अशी बेकायदेशीर अटक करून राज्य सरकारविरोधात राज्यातील शेतकरीवर्गाला चिथवण्याचे काम प्रशासनात बसलेले काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला बदनाम करण्याचे आणि त्यांच्याविरोधात शेतकर्‍यांचे प्रक्षोभ निर्माण करण्याचे काम जिल्हा पोलिस दलातील कोणत्या अधिकार्‍याने केले? आणि कुणाच्या इशार्‍यावरून केले? याचा तातडीने शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलढाणा पोलिसांना तुपकरांच्या घरात घुसून अटक करावी, असे आदेश कुणी दिले? हे स्पष्ट झाले तर फडणवीसांविरोधात कट रचणार्‍या अधिकार्‍यांचा बुरखा टराटरा फाटेल. दरम्यान, गृहमंत्रालयातील वरिष्ठस्तरीय सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले, की तुपकरांना अटक करण्यासंदर्भात गृहमंत्रालयातून कोणतेही निर्देश गेलेले नाहीत. याचा अर्थ स्थानिक पातळीवर पोलिसांनी ही कारवाई केली असावी. तेव्हा स्थानिक पोलिसांची भूमिका तपासून पाहण्याची गरज आहे.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना, जालना पोलिसांनी आंदोलकांवर जुलमी अत्याचाराने लाठीमार केला. मराठा समाजावर झालेल्या या हल्ल्याने शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिघळले. हे लाठीमारचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले, अशा अफवा पसरविल्या गेल्यात. तसेच, काही राजकीय नेत्यांनीदेखील तसे आरोप केलेत. परंतु, माहिती अधिकारातून सत्य उघड झाले व हे आदेश फडणवीसांनी दिलेले नाहीत, हे स्पष्ट झाले. आतादेखील देवेंद्र फडणवीस हे शेतकरी चळवळीचे महत्व जाणणारे जाणकार नेतृत्व आहे. तुपकरांच्या मागण्या या शेतकरीहिताच्या आहेत, व त्याबाबत फडणवीस हे काही अडचणी असल्या तरी सकारात्मक आहेत. त्यांनी रविकांत तुपकरांना घरात घुसून अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिलेच नाहीत, किंबहुना या कारवाईबाबत फडणवीसांना माहितीदेखील दिली गेली नाही, अशी आमच्या कानावर आलेली गोपनीय माहिती आहे. तरीदेखील मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्याचा इशारा दिला म्हणून शेतकरी चळवळीतील नेत्याला घरात घुसून अचानक अटक केली जाते, आणि ती अटक न्यायालय बेकायदेशीर ठरवते, याचा अर्थ प्रशासनाने फडणवीसांना बदनाम करण्याची कुणाची सुपारी घेतली? असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. गृहमंत्र्यांनी पोलिसांचा हा उद्दामपणा गांभीर्याने घ्यावा, व जे कुणी पोलिस अधिकारी अशा प्रकारे राज्य सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे. सद्या मुंबईत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत, रविकांत तुपकर हे मुंबईत गेलेच नाहीत, तर त्यांना अटक करण्याची गरज काय होती? त्यांनी कुठे हे प्रतिबंधात्मक आदेश मोडले होते? कोणत्या कायदेशीर बॅकग्राउंडवर पोलिसांनी तुपकरांना अटक केली होती? हे गृहमंत्र्यांनी तातडीने तपासावे, व पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची दखल घ्यावी, अशी मागणीही सुज्ञ नागरिकांतून पुढे येत आहे.
अंतरवली सराटीत प्रशासनाने कट रचून मराठ्यांना उचकावले व सरकारविरोधात मुद्दामहून मराठ्यांचा उद्रेक निर्माण केला, असा संशय आता सर्वांना येऊ लागला असतानाच, त्याचा राजकीय फटकादेखील भाजपला बसणार आहे. बुलढाण्यातदेखील गरज नसताना रविकांत तुपकरांना अटक करण्याचा खटाटोप बुलढाणा पोलिसांनी केल्याचे दिसते आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आग्यामोहोळ उठले असून, राज्यातील भाजप-शिंदे गटाच्या सरकारविरोधात शेतकरी आग ओकू लागले आहेत. शिवाय, रविकांत तुपकरदेखील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलनास बसणार आहेत. परिणामी, राज्यभर शेतकरी आंदोलन पेटणार असून, आधीच्या मराठा आंदोलनात आता शेतकरी आंदोलनाची भर पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याचे काम पोलिस दलातील कोणते अधिकारी करत आहेत? त्यांचा हेतू काय आहे? याचा तातडीने फडणवीस यांनी तपास करावा. प्रशासन सरकारविरोधात कटकारस्थाने रचत असल्याचा संशय असून, त्याचा राजकीय फायदा कुणाला तरी देण्याचा ते प्रयत्न करत असावेत, अशी शक्यता आहे. प्रशासनाची प्रत्येक कृती देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेण्याची गरज आहे. जालन्यातील प्रशासनाने ज्या पद्धतीने कारस्थान केले व शांततापूर्ण आंदोलन चिघळवले, तसेच कारस्थान रविकांत तुपकरांच्याबाबतीतही झालेले असावे, असा संशय निर्माण्ा झालेला आहे. त्यातून फडणवीसांना अडचणीत आणण्याचा तर या अधिकार्‍यांचा कुहेतू नाही ना? तुपकरांना अटक करण्याचे आदेश कुणाचे होते? याचा तातडीने तपास झाला तर तुपकरांच्या अटकेमागील फडणवीसांना बदनाम करण्याचे फार मोठे षडयंत्र उघडकीस येण्याची शक्यता वाटते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!