बुलढाण्यातील ‘एल्गार’ हा फक्त ट्रेलर; ‘खरा पिक्चर मुंबईत’!
– शेतकर्यांना तातडीने न्याय द्या; अन्यथा २९ तारखेला मंत्रालयाचा ताबा घेणार – रविकांत तुपकर
– पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुलढाण्यात घेतली शेतकरी नेते रविकांत तुपकरांची भेट
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य सरकारने सोयाबीन व कापसाला दरवाढ द्यावी, दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट एकरी १० हजार रूपयांची मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा सरकारला शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. २९ तारखेला शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज (दि.२३) पालकमंत्री तथा राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत राज्य सरकारला ठणकावून सांगितले. पालकमंत्री हे आज बुलढाण्यात आले असता, त्यांनी तुपकरांशी चर्चा करून शेतकर्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच, याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून चर्चा घडवून आणण्याची ग्वाही देत, फार टोकाचे आंदोलनात्मक पाऊल उचलू नका, अशी आग्रही सूचनादेखील तुपकरांना केली. याप्रसंगी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.नाजीर काझी, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व पोलिस अधीक्षक सुनील कडासने, ज्येष्ठ नेते तुकाराम अंभोरे-पाटील, विनायक सरनाईक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज बुलढाणा येथे आले असता, शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिष्टमंडळाशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या व्यथा आणि समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. शेतकर्यांच्या मनात सरकारविरोधी असलेला तीव्र रोष यावेळी त्यांनी ना.वळसे पाटील यांच्या लक्षात आणून दिला. शेतकर्यांच्या भावना तीव्र आहेत, शेतकर्यांच्या संयमाचा अंत न पाहता शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली. शासनाने सोयाबीन-कापूस दरवाढ, दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट एकरी १० हजार रूपयांची मदत व अन्य मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा सरकारला शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे तुपकरांसह शिष्ठमंडळाने पालकमंत्री वळसे-पाटीलांना सांगितले. यावेळी आमदार तथा ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकरांकडून शेतकर्यांच्या मागण्या आणि समस्यांची सविस्तर माहिती घेऊन सकारात्मक चर्चा केली. पालकमंत्री वळसे पाटील व आ. शिंगणे यांनी लवकरच सरकार सोबत बैठक बोलावून त्यामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल, अशी ग्वाही यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिली.
चर्चेदरम्यान, येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर २९ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील, आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, असे तुपकरांनी पालकमंत्र्यांमार्फत राज्य सरकारला ठणकालून सांगितले. सोयाबीन कापूस-उत्पादक शेतकरी आता एकवटला आहे. बुलढाणा जिल्ह्यात ‘एल्गार रथयात्रे’ला मिळालेला तुफान प्रतिसाद व २० नोव्हेंबररोजी निघालेला रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा हे ट्रेलर होते. आता आरपारची लढाई मुंबईत होईल, असा इशारादेखील तुपकरांनी राज्य सरकारला. तुपकरांच्या शिष्टमंडळात विनायक सरनाईक, नितीन राजपूत, अॅड. राज शेख, मोहम्मद अझहर, पवन देशमुख, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, रामेश्वर अंभोरे, रवींद्र जेऊघाले, गजानन देशमुख, विजय जेऊघाले आदी पदाधिकार्यांचा समावेश होता.
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री मा.ना.दिलीपजी वळसे पाटील यांच्यासोबत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आ.डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरणजी पाटील, पोलीस अधीक्षक सुनीलजी कडासने उपस्थित होते. pic.twitter.com/Ac3Whr4gI7
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) November 23, 2023