महाविकास आघाडीत शरद पवारांनी बुलढाण्याचा आग्रह सोडला!
– बुलढाण्याची जागा महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) किंवा वंचित बहुजन आघाडी लढणार!
मुंबई/ बुलढाणा (खास प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष रणनीती आखण्याच्या कामास लागले असून, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीसह जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अहमदनगर, कोल्हापूर आणि सातारा या आठ जागा मागितल्या असून, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा दावा मात्र सोडला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठ स्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे. बुलढाण्यातून लोकसभेसाठी पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर या इच्छुक होत्या. परंतु, ही जागा शिवसेना (ठाकरे) किंवा प्रकाश आंंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी लढविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाविकास आघाडी यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी तिहेरी लढत रंगणार आहे.
शरद पवार यांनी दावा केलेल्या जागेपैकी कोल्हापूर, रामटेक मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार शिंदे गटात गेलेले आहे. तर सातार्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. अहमदनगर, माढा, दिंडोरी, जळगाव या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या जरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडून आल्या असल्या तरी आता त्या भाजपसोबत असल्याचे दिसून येत आहे. बुलढाण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. परंतु, या जागेवरील दावा शरद पवारांनी सोडला असल्याचे स्पष्ट होत असून, ही जागा शिवसेना (ठाकरे) यांच्याकडे कायम राहणार आहे. तथापि, येथून शिवसेना किंवा प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाआघाडीसोबत गेले तर येथून ‘अमरावती पॅटर्न’प्रमाणे तुपकर यांना लोकसभेवर पाठविले जाण्याची शक्यता आहे, व त्या शक्यतेवर राजकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, यंदा ही जागा भाजप घेण्याची दाट शक्यता असून, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची असलेली ही जागा त्यांच्यासाठी धोक्यात आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जोरदार लाट निर्माण झाली असून, त्यांच्याविरोधात कुणीही उभे राहिले तरी त्याचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष येथून उमेदवार जाहीर करण्यासाठी विचारपूर्वक विलंब लावत आहेत.
भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या महायुतीत अजित पवार यांनीदेखील बुलढाणा व सातार्याची जागा मागितली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा महाविकास आघाडीत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गटाने धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा – गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रह धरलेला आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.