– रस्त्यावर पडले मोठमोठाले खड्डे, रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर काटेरी झुडपाचे अतिक्रमण!
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रोडवरील झाडाच्या वाकलेल्या फांद्यामुळे वाहन चालकांना तसेच नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे सदर झाडाच्या फांद्या रोडवरील वाहनावर पडून कित्येक वाहनचालकांना अपघातग्रस्त व्हावे लागले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करून मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द रोडवरील सर्व झाडांच्या फांद्या तोडून रोडवरील वाहन चालक तसेच गावातील नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा मेरा बुद्रूक, अंत्रि खेडेकर रोडवरील वाहन चालक तसेच मनुबाई, गुंजाळा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मनुबाई, गुंजाळा, मेरा बुद्रुक येथील नागरिकांना तहसील व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या या महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर काटेरी झुडपाने अतिक्रमण तसेच रस्त्याच्या बाजूला लावलेल्या झाडाच्या फांद्या या अपघाताला आमंत्रण देत असूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
————-