Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडकणार शेतकरी वादळ!

– जिल्हाभरातून बळीराजांच्या फौजांची रात्रीच बुलढाण्याकडे कूच!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी पिचलेल्या तसेच, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत व्यापक शेतकरी आंदोलन हाती घेतले आहे. तसेच, सोमवारी (दि.२०) बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा विराट असा एल्गार मोर्चा धडकणार आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून केवळ शेतकरीहितासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन तुपकरांनी केले असून, बळीराजांच्या फौजांनी रात्रीच बुलढाण्याकडे कूच केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा मोर्चा राज्य सरकारच्या उरात धडकी भरवणारा ठरणार आहे. दरम्यान, या महामोर्चाला सुरूवात होण्यापूर्वी सकाळी साडेअकरा वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे हभप. पुरूषोत्तम महाराज पाटील (भुतेकर) यांचे कीर्तन होणार असून, त्यानंतर जिजामाता प्रेक्षागार येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रे’ला जिल्हाभरात तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या रथयात्रेचा समारोप सोमवारी एल्गार मोर्चाने होणार आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधव हे आपल्या हक्कासाठी पेटून उठले असून, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा हा मोर्चा अतिविराट ठरण्याची शक्यता आहे. काल (दि.१८) १४ व्या दिवशी एल्गार रथयात्रा मोताळा तालुक्यातून बुलढाणा तालुक्यात दाखल झाली. मोताळा तालुक्यातील तालखेड, नभापूर, परडा, शिरवा, कोथळी, सहस्रमुळी, तरोडा, बोरखेड या गावांमध्ये संवाद साधल्यानंतर बुलढाणा तालुक्यात वरवंड फाटा येथे यात्रेची दमदार एन्ट्री झाली. वरवंड गावकर्‍यांनी जोरदार असे जंगी असे स्वागत केले. त्यानंतर बुलढाणा तालुक्यातील भादोला, वाडी-भादोला, पोखरी, माळविहिर, सावळा फाटा, येळगाव फाटा, सव, रुईखेड टेकाळे, खेर्डी, डोंगरखंडाळा येथे यात्रेला जोरदार-दमदार प्रतिसाद मिळाला तर त्रीशरण चौकात यात्रेचे सुंदरखेड ग्रामपंचायतीने व शहरवासीयांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. ‘एल्गार महामोर्चा’साठी सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ‘तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, अशी ग्वाही देत मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार शेतकरी, कष्टकरी बांधवांनी केला आहे.


तुपकरांच्या मोर्चावर सरकारचे लक्ष!

बुलढाणा येथील मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हा पोलिस दलानेदेखील तयारी केली असून, चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यास सुरूवात केली आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस अधिकारी कामाला लागले आहेत. उद्याचा मोर्चा हा शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे शक्तिप्रदर्शन ठरणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या मोर्चातून तुपकर हे फुंकणार आहेत. दरम्यान, पीकविम्याची रक्कम, सोयाबीन, कपाशीला भाव देणे यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेतला असल्याची माहिती हाती आली असून, या संदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तुपकरांच्या मोर्चाकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष असल्याचे वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे. फडणवीस यांनीही उद्याच्या मोर्चाबाबत त्यांच्या निकटवर्तीयांकडून आढावा घेतला असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!