सोलापूर (हेमंत चौधरी) – राज्यात दिवाळीनंतर शाळांना असलेल्या सुट्ट्या तसेच शासकीय अधिकारी व नोकरदारांनी रजा टाकून घेतलेल्या सुट्ट्यांत देवदर्शनासाठी गर्दी केल्याने देवस्थानांवर गर्दीचा महापूर दिसून आला आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे समाधीमंदीर, पंढरपूर येथील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात अलोट गर्दी झाली असून, दर्शनरागांचे नियोजन कोलमडत असल्याने सर्व संस्थानांसमोर दर्शन रांगांचे नियोजन मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तसेच, वाहनांच्या पार्किंगचीदेखील मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दिवाळीनंतर शाळेला असलेल्या सुट्ट्या तसेच शासकीय अधिकार्यांनी रजा टाकून, तसेच मोठ्या प्रमाणात भाविक देवदर्शनासाठी बाहेर पडले असून, त्यांनी तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट येथे तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदीर पंढरपूर येथे मोठी गर्दी केली आहे. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने देवस्थान कमिटीला प्रचंड तणावाखाली भाविकांशी चर्चा करून मार्ग काढावे लागत आहे. तुळजापूरला काल व आज घाटातच गाड्या थांबव्या लागल्या. कारण तुळजापूर शहरात इतक्या गाड्या आल्या आहेत, की त्यांना कुठेच पार्किंगची सोय होऊ शकली नाही. त्यामुळे काही काळ गाड्या उस्मानाबाद हायवेकडून सोडण्यात आल्या. दर्शनासाठी भाविकांना चार ते पाच तास खोळंबावे लागत होते. त्यामुळे काल व्यापार्यांच्या दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत होती. व्यापारीवर्गाचे म्हणणे होते, की यावेळेच्या दिवाळीत लोकांनी देवदर्शनासाठी गर्दी अचानक केल्याने धावपळ उडाली होती. तरी यापुढे भाविकांनी येताना गरजेचा अंदाज घेऊनच गाड्या घेऊन यावे, अशी विनंती तुळजापूरचे पुजारी सर्वांना करीत होते.