बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून, शेतकरी विकास पॅनलच्या भाजपा+ शिंदे गट+ संतोष राजनकर काँग्रेस गट+ चेतन घिवे वंचित गट या महायुतीने १८ पैकी १२ जागा जिंकून कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज केली. तर प्रतिस्पर्धी शेतकरी सहकारी विकास आघाडीला केवळ ६ जागा मिळाल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शेतकरी विकास पॅनलचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात झाली. त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले तर या विजयाने आमदार डॉ.संजय कुटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संग्रामपूर बाजार समिती निवडणुकीत दुपारनंतर उत्साही मतदान झाले व शेतकरी विकास पॅनलला लाभदायक ठरले. दि.१९ नोव्हेंबर रोजी सकाळी वरवट बकाल येथील शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. दोन्ही पॅनलचा एक एक उमेदवार विजयी झाल्याची घोषणा झाल्याने निवडणूक चुरशीची झाली. यात ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ उमेदवार, सहकारी संस्था महिला राखीव उमेदवार, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ दोन्ही पॅनलच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनाचा अल्पमताने पराभव झाला. निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. मतमोजणी अंती निकाल जाहीर करण्यात आला असून, विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे.
महायुतीप्रणित शेतकरी विकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये भाऊराव गणपत अवचार १९५ मते, संतोष देविदास राजनकार १७४ मते, राजेन्द्र किसनराव ठाकरे १७२ मते, शांताराम दाणे १६४ मते, रमेश नारायण फाळके १६० मते, संजय इंगळे ४५ मते, उमेश टावरी ११८ मते, प्रदीप वडोदे १५८ मते, रविंद्र रावणकार २४५ मते, श्रीकृष्ण बोरसे १७२ मते, चित्रा ज्ञानदेव मुयांडे १७६ मते, सुरेश तायडे २१८ मते, अशी मते पडली आहेत. संग्रामपूर बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनल महायुतीने झेंडा फडकविला असल्याने आ. डॉ. संजय कुटे यांनी विजयी उमेदवार व नवनिर्वाचीत संचालक यांचा हार घालून सत्कार करित कौतुक केले. तर शेतकरी विकास पॅनल महायुतीच्या पदाधिकार्यांनी एकमेकांना पेढे वाटून गुलाल उडवित जल्लोश आंनदोत्सव साजरा केला. यावेळी आ डॉ संजय कुटे, वंचित बहुजन आघाडीचे चेतन घिवे, काँग्रेसचे संतोष राजनकर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्यासह नवनिर्वाचीत संचालक कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीकृत शेतकरी सहकार महाविकास आघाडी पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले असून, यामध्ये राजेंद्र वानखडे २४५ मते, अभयसिंह मारोडे २१४ मते, रविन्द्र झाडोकार १५५ मते, कुसुमबाई देवलाल वखारे १४४ मते, शेख सलीम ८८ मते, श्रीकांत मारोडे १५५ मते घेऊन विजयी झाले आहेत.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी संचालक शेतकरीहिताचे कार्य करुण बळीराजाची सेवा करतील – आ. डॉ. संजय कुटे
संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्याच्या मेंहनतीच्या ज़ोरावर शेतकरी विकास परिवर्तन पॅनल ने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहें. हे सर्व संचालक शेतकरी हिताचे काम करतील, अशी ग्वाही आ. डॉ. संजय कुटे यांनी दिली आहे.
———-