BULDHANAChikhaliHead linesVidharbhaWorld update

स्वतःच काळीज देऊन बहिणीनेच भावाला दिली जीवदानाची ओवाळणी!

भावाला काळीज देऊन बहिणीने घेतला जगाचा निराेप

अंढेरा, ता. देऊळगावराजा (प्रतिनिधी) – ऐन दिवाळी सणात बहिणीने आपल्या थोरल्या भावाला आपले काळीज (यकृत) देऊन त्याचा जीव वाचविला. भाऊबिजेला भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. पण येथे बहिणीनेच काळीज देऊन भावाला जीवदानाची ओवाळणी घातली. देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे ही हृदयस्पर्शी घटना घडली. आणि, रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार, या बहिणीचा या यकृत प्रत्यारोपणानंतर दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. भावाला जीवदान देऊन या बहिणीने मात्र जगाचा निराेप घेतला आहे. दुर्गा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. मोठ्या भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या अशा अकाली मृत्यूमुळे जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सविस्तर असे, की अंढेरा येथील रमेश नागरे (वय ४८) यांना २०१९ पासून पोटाचा विकार सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात त्यांना देऊळगावराजा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे दाखविण्यात आले. मूळ कारण लक्षात येत नसल्याने अखेरीस त्यांना मुंबईतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आले. तेव्हा नागरे यांच्या यकृतात (लिव्हर)मध्ये काही दोष असल्याचे निदान झाले. त्यात यकृताचा खराब झालेला भाग काढून टाकणे गरजेचे होते. त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले लिव्हर घटक मिळविण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. लिव्हर देणाऱ्या व्यक्तीचे आणि रमेश नागरे यांचा रक्तगट व अन्य काही सम असणे आवश्यक होते. अनेकांचा रक्तगट तपासण्यात आला, त्यात बहीण दुर्गा धायतडक यांचा रक्तगट रमेश यांच्याशी जुळला. दुर्गा या रमेश यांच्या धाकट्या बहीण आहेत. पळसखेड चक्का येथील धायतडक यांच्या घरात त्यांना दिलेले आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाला आलेली आहे.
या बहिणीने काळजाचा तुकडा असलेल्या या भावासाठी काळीज म्हणजे यकृत दान करण्याचे ठरवले. डॉक्टरांनी दुर्गा यांच्या सर्व आवश्यक तपासण्या केल्या आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, मुंबई येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी हे ट्रान्सप्लांट झाले. सद्या भाऊ सुखरूप आहे, तर बहिणीची मात्र प्राणज्योत मालवल्याची दुर्देवी बातमी रात्री उशिरा मिळाली आहे. रमेश नागरे यांना मात्र आणखी काही दिवस पुढील उपचार चालू राहणार आहेत. बहीण-भावाच्या या प्रेमाची व त्यागाची चर्चा अंढेरासह परिसरात होत आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्गा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. मोठ्या भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या अशा अकाली मृत्यूमुळे जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!