सोलापूर (हेमंत चौधरी) – सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सोलापुरातील दोन आमदार विजयकुमार देशमुख व सुभाषबापू देशमुख यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सर्वपरिचीत आहे. त्याची झलक आज (दि.१६) सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमातदेखील दिसली. हे दोन नेते एकमेकांसमोर आले असताना, सुभाषबापूंनी विजय देशमुखांना हस्तांदोलन टाळले. त्यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा रंगली होती.
सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आज थाटात पार पडला. ज्येष्ठ नेते शरद पवार या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. तथापि, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात सोलापूर शहर उत्तरमधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. सुभाषबापूंच्या सत्कारानंतर त्यांनी उपस्थित मान्यवरांशी हस्तांदोलन केले, परंतु विजयकुमार देशमुखांशी हस्तांदोलन तर टाळलेच, पण त्यांच्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही. त्यामुळे हे प्रकरण व्यासपीठावर व प्रेक्षकांत चर्चेचा विषय ठरले होते.