Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPoliticsWorld update

तुझ्यासारखं सासर्‍याच्या घरी तुकडे मोडत नाही!

– अंबड येथे ओबीसींचा अतिविराट एल्गार महामेळावा, लाखोंच्या संख्येने ओबीसी एकवटले!
– मंत्र्यांना गावबंदी, आमदारांना गावबंदी, महाराष्ट्र काय तुमच्या सातबार्‍यावर लिहून दिला काय?
– आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही; आम्हाला आरक्षण संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी दिले; आम्ही आमच्या हक्काचे खातोय – ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांना ठणकावले!

अंबड, जि. जालना (प्रतिक सांगळे/प्रतीक्षा सुतार) – आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, आम्ही कधीच विरोध केला नाही. दुर्देवाने कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले पण आम्ही कोणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. मराठा समाजातील काही पोरासोरांनी गावोगावी गावबंदीचे बोर्ड लावले. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे, महाराष्ट्र तुमच्या सातबार्‍यावर लिहून दिला काय? पोलिसांना माझे सांगणे आहे, की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. आमदार, राजकीय नेत्यांना गावात घ्यायचे नाही, दोन चार पोट्टी बोर्ड लावतात की गावात यायचे नाही आणि धांदल करतात. हे आता चालणार नाही. सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही? आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लीम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा घरचा आहेर राज्यातील सरकारला देत, आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही; आम्हाला आरक्षण संविधानाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले; आम्ही आमच्या हक्काचे खातोय. तुझ्यासारखे सासर्‍याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते तथा राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाची ओबीसीच्या वाट्यातून मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना अंबड शहरातील पाचोड रोडवरील धाईतनगर येथे आयोजित अतिविराट ओबीसी एल्गार महामेळाव्यातून सडकून टीका करत ठणकावले.

ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होण्यासाठी उपोषण करत राज्य सरकारला वेठीस धरणारे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांनी शुक्रवारी (दि.१७) जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार महामोर्चा काढला. तेथे भुजबळ बोलत होते. या महामेळाव्याला राज्यभरातील लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव, भगिनी हजर झाल्या होत्या. मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी घेतलेल्या लाखोंच्या संख्येच्या सभेला हा महामेळावा जोरदार प्रत्युत्तर ठरला. या महामेळाव्याला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केले. तसेच, काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह ओबीसीतील प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हेतूवर जोरदार टीका करत, ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे यांची अनुपस्थिती मात्र सर्वांना खटकली.
प्रमुख भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की देवसुद्धा यांच्या सात-बार्‍यावर लिहिले आहेत, पंढपूरची पूजा अजितदादांनी करायची नाही म्हणजे काय? पंढरपूरचा राजा सगळ्यांचा आहे. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार, कृष्ण यादव म्हणजे ओबीसी, देवाला जात लावायची झाली तर मग तो ओबीसी आहे, असे सांगून, तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशारासुद्धा भुजबळांनी जरांगे पाटलांना दिला. तसेच ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करत, ती तातडीने करा, असेही ते म्हणालेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सूनेलादेखील आई म्हणून परत पाठवले. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला?’, असा घणाघात भुजबळांनी केला. हा ओबीसांचा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, तालुक्यातालुक्यात मेळावे घ्या, असेसुद्धा ते म्हणालेत. पुढचा ओबीसी मेळावा २६ नोब्हेंबरला हिंगोलीमध्ये होणार आहे, असे सांगून, त्यांनी जरांगे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले, की होय मी जेलमध्ये बेसण भाकरीच खाल्ली. पण, मी जे खातो ते माझ्या कष्टाचेच खातो. तुझ्यासारखे सासर्‍याच्या घरी खात नाही.

मनोज जरांगे म्हणतात हे आरक्षण कुणाचे खातात, कुणाचे खातात? आम्ही तुझे खाते का रे? ओबीसींच्या आरक्षणाचा आदेश केंद्राने दिला होता. शरद पवारांनी केवळ त्याची अंमलबजावणी केली. आम्ही आरक्षणासाठी कुणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. राज्याने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते सुप्रीम कोर्टात रद्द झाले. ते रद्द का झाले, याचा अभ्यास करा. आजही मराठा नेते महाराष्ट्रात खूप आहेत. मला मराठा तरुणांना सांगायचे आहे की, अरे दगडाला शेंदूर लावून तुम्ही कोणाला देव करताय. याला काहीही कळत नाही. त्यांना केवळ दादागिरी निर्माण करायची आहे. मराठा समाजाला आज काही मिळत नाही, असे आहे का? अनेक योजनांमधून मराठा समाजाला भरघोस मदत देण्यात आली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. पण, ७० पोलिस रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले. घरांवरून पोलिसांवर दगडांचा मारा केला गेला. पोलिस काय तेव्हा पाय घसरुन पडले होते का? यात अनेक महिला पोलिस जखमी झाल्या. महिला आयोगाने या महिला पोलिसांची चौकशी करावी. तेव्हा काय झाले, हे त्या तुम्हाला सांगतील. असे करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? हे झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण, आमच्या राज्यकर्त्यांचे काय सांगायचे. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांवर लाठीचार्ज केल्यानंतर हे शूर सरदार (जरांगे) घरात जाऊन पडले होते. त्यानंतर राजेश टोपे, रोहित पवार यांनी जरांगेंना पुन्हा उपोषणाच्या स्टेजवर आणून बसवले व शरद पवारांना त्यांची भेट घ्यायला लावली. पवारांना आम्ही अजूनही उत्कृष्ट प्रशासक मानतो. पण, त्यांना सर्व सत्य सांगितले गेले नाही. राज्य, देशाच्या पुढे खरे चित्र आलेच नाही. उलट पोलिसांवरच निलंबनाची कारवाई झाली. आमदार प्रकाश सोळंकेंचे घर नियोजन करुन जाळण्यात आले. चारशे जणांनी घरावर हल्ला केला. कोड नंबरवरुन आमदारांची घरे जाळली गेली. एक नंबर प्रकाश सोळंके, दोन नंबर जयदत्त क्षीरसागर. कुठे आहे? असे कुणी विचारले तर हे हल्लेखोर सांगायचे कोड नंबर एकवर आहे. राखरांगोळी हा शब्द म्हणजे काय हे मी त्यादिवशी पाहिले. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांचे दोन, तीन माळ्यांचे घर राख करुन टाकले. तेव्हा महिला, सर्वांची मुले-बाळे घरात होती. तरीही घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यांचीही लेकरबाळं होती हो तिथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरे जाळायला तुम्हाला सांगितले? याची चौकशी कधी होणार? हे दु:ख आमच्या मनात आहे. मनोज जरांगे हे उपोषणाला बसले. मग आले महाराज. मी आता महाराजांचे नाकारु शकत नाही म्हणून पाणी पितो. मग आले न्यायमूर्ती. मंत्री एवढे वाकले की त्यांच्या कंबरेलाही शेक द्यावा लागला असेल. वर मंत्र्यांनी न्यायाधीशही सोबत नेले. अरे तो पाचवीही शिकलेला नाही रे, अशी टीका करत, भुजबळांनी मनोज जरांगे यांचे पुरते वस्त्रहरण केले. याद राख तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करु नको. हा म्हणतो २७ टक्के ओबीसींना ३० टक्के आरक्षण कसे काय? मी म्हणतो जनगणना करा. मग कळेल. लोकसंख्येत आम्ही ६३ टक्क्यांच्या आसपास आहे. जनगणना करा ना. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. जनगणना झाली पाहिजे. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातालुक्यात मेळावे झाले पाहिजे. ही ज्योत आता पेटली पाहिजे. त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास आमची काहीही हरकत नाही. पण, तेलंगणात पूर्वी कुणबी दाखले सापडले नव्हते, तेथे दोन दिवसानंतर १५ हजार नोंदी सापडल्या. वर एका दाखल्यावर त्यांच्या सर्व कुटुंबीयांना, सगेसोयर्‍यांना दाखले वाटप. आजही दलितांना आपले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्ष वर्ष वाट पाहावी लागते. त्यामुळे सरसकट कुणबी दाखले देणे बंद झाले पाहिजे. आमदारांना गावबंदी, नेत्यांना गावबंदी. महाराष्ट्र तुम्हाला सातबार्‍यावर लिहून दिलाय का रे? जशास तसे उत्तर द्यावे लागेल. गावागावात लावलेले हे गावबंदीचे फलक हटवले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही ओबीसी, दलित, मुस्लीम सगळे एकटवू. पण, दादागिरी खपवून घेणार नाही. मला रोज शिव्या, गृहमंत्री फडणवीसांनाही शिव्या. मला म्हणतो येवल्यात कसा निवडून येतो बघतो? अरे तू काय बघतो? म्हणे पंढरपूरला अजितदादांनी यायचे नाही. पंढरपूरच्या देवालाही यांनी जात लावली का? माझी आता एकच विनंती आहे. मागे हटायचे नाही. घाबरायचेही नाही. आरक्षण म्हणजे काय ते आधी समजून घे, आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे म्हणजे काय? हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आरक्षण मिळून दलित समाजातले लोक कलेक्टर झाले, अधिकारी झाले. पण आजही दलित समाज मोठ्या प्रमाणात गरीब आहे. ओबीसी समाजही गरीब आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, फडणवीस यांच्या काळात जेव्हा विधानसभेत मुद्दा आला तेव्हा मी म्हणालो मराठ्यांना आरक्षण द्या. आरक्षणाचे प्रकरण कोर्टात अडकले तर त्यावर अभ्यास करा. कुणाची घरे किवा दुकाने आम्ही जाळली नाहीत, असा टोलाही भुजबळांनी जरांगे पाटलांना हाणला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, की छगन भुजबळ हे ओबीसींचा बुलंद आवाज आहेत. राज्यात आज पिवळे वादळ आले आहेत. ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी ही ऐतिहासिक सभा आहे. आम्हाला कुणी धमकी दिली तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू. आम्हाला पदापेक्षा समाज अधिक महत्त्वाचा आहे. ओबीसी हा साडेतीनशे जातींचा समावेश आहे. तुम्ही म्हणताय आमच्या जमिनी कमी झाल्या. पण, पिढ्यान पिढ्या ज्याच्याकडे जमिनी नाही, त्याची काय व्यथा असेल याचा विचार करा. ५० एकरचा शेतकरी आता १० एकरवर आला असेल, पण ज्याच्याकडे दोन एकरही जमीन नाही, त्याचा विचार तुम्ही करणार की नाही. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखे वागावे. लहान भावाच्या ताटातले काढण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एकदा जातनिहाय जनगणना करुन टाका. मग तुम्हाला कळेल, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी. ओबीसी आरक्षणाला कुणी धक्का लावता कामा नये. आमच्या जीवात जीव्ा असेपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. ओबीसीहिताचे जो बोलेल तोच या देशावर राज्य करेल. आता घाबरण्याचे कारण नाही. संपूर्ण गाव वाचवा तरच घर वाचेल, हे ओबीसींनी लक्षात ठेवावे. बीडमध्ये ओबीसींचे घर जाळले, त्यांची चूक काय होती? ओबीसी आरक्षण ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. सरकारने ज्याला आरक्षण द्यायचे त्याला द्यावे. पण, ओबीसींचा वाटा कमी करु नये. अंबडची सभा तुंबड झाली. पण, आता जिल्ह्याजिल्ह्यात सभा घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील चित्र बदलण्याची ताकद आता निर्माण करु. सरसकट कुणबी दाखले देणे बंद करा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले, मनोज जरांगेंनी मोठी सभा घेतली म्हणून आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळवणे हे ऐरागबाळ्याचे काम नाही. मराठा समाजाचे १६० आमदार पाडण्याची ताकद ओबीसी समाजात आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देणे शिंदे सरकारने आता बंद करावे. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर राज्यात ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेंडगे यांनी दिला. तर महादेव जानकर म्हणाले, भुजबळ साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की, आता ओबीसींचा पक्ष काढा. नाहीतर काहीही फायदा नाही. आपण ओबीसींसाठी लढायचे आणि काँग्रेसचाच कुणीतरी ओबीसी म्हणून निवडून येईल. त्यामुळे ओबीसींचा पक्ष काढण्यासाठी भुजबळांनी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहन जानकर यांनी केले.
या विराट सभेला संबोधित करण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे हेलिकॉप्टरने आले. त्यांची अतिशय दिमाखदार एंट्री झाली. ते म्हणाले, की आजच्या दिवसाची इतिहासात नोंद होईल. सगळे ओबीसींचे बछडे आज एकत्र आले आहेत. आपण अशी डरकाळू फोडू की ओबीसींच्या आरक्षणाविरोधात बोलणार्‍याच्या काळजाचा थरकाप झाला पाहिजे. ओबीसी आरक्षणात काटे पेरण्याचे काम काही जण करताहेत. ते काटे बाजूला करण्याचे काम ओबीसी समाज करेल. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आता जागा झाला आहे. ओबीसींचा ढाण्या वाघ छगन भुजबळांचे मला विशेष अभिनंदन करायचे आहे. ओबीसी समाज जागा करण्याचे काम भुजबळांनी केले आहे. वाघ म्हतारा झाला म्हणून डरकाळी फोडायचे सोडत नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे रक्त आमच्या रक्तात सळसळत आहे. अन्यायाविरोधात बंड केले पाहिजे, हा महात्मा फुलेंचा मंत्र तंतोतत पाळण्याचे काम छगन भुजबळांनी केले आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याला आमचा विरोध नाही. परंतु, ३४६ जातींचा समावेश असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अजूनही ओबीसीमधील अनेक जातींना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. अनेक जाती अशा आहेत ज्यामधील व्यक्तींना अजून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य होता आलेले नाही. त्यामुळे ओबीसींच्या या आरक्षणाला धक्का लावला तर ओबीसी चवताळून उठल्याशिवाय राहणार नाही. ओबीसीत अजून कितीतरी जातसमूह अजून वंचित आहेत. त्यामुळे छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे, ती अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रातील ५ कोटी धनगर समाज भुजबळांच्या सोबत आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? ओबीसी मराठ्यांचा शत्रू नाही. मराठा समाजातील नेतेच या समाजाचे शत्रू आहेत. ओबीसी फक्त स्वत:चे आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पडळकर म्हणाले.

ज्यावेळी मंडल आयोगाने ओबीसी आरक्षण दिले, त्यावेळी न्यायालयात याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायमूर्ती सुनावणीसाठी बसले. महाराष्ट्राचे थोर विचारवंत पी. बी. सावंत हेही या खंडपीठात न्यायमूर्ती होते. त्या सर्वांनी सांगितले की, या ओबीसींचा मुद्दा बरोबर आहे. त्यांना आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्क्यानिशी या राज्यात २०१ जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आला. याबाबत मार्च १९९४ मध्ये शासन आदेश (जीआर) निघाला. आम्हाला असेच ओबीसीत घुसवण्यात आलेले नाही. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय असं म्हणत आहात. तुझे खातो का रे?’
– छगन भुजबळ, ओबीसी नेते, मंत्री

लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन झोपले – भुजबळांचा गौप्यस्फोट

‘दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा, तुम्ही दादागिरी निर्माण करतात का?,’ असा सवाल करत भुजबळ यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जावून पळून झोपले. यांना हे अंबडचे आमचे मित्र टोपे साहेब (राजेश टोपे), दुसरे आमचे मित्र रोहित पवार, त्यांना घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हणाले, बस तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. पण यांनी शरद पवारांना हे नाही सांगितले की, लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आम्ही आजही उत्कृष्ठ प्रशासक समजतो’, असा गौप्यस्फोटही भुजबळांनी करून जरांगे पाटलांचा भित्रेपणा उघड केला.

पंकजा मुंडेंची अनुपस्थिती; महादेव जानकर मिनीटभर भाषण करून निघून गेले!

मेळाव्याच्या बॅनरवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो छापण्यात आलेला होता. मात्र, मेळाव्यासाठी त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत. खरे तर पंकजा मुंडे ह्या यापूर्वी झालेल्या ओबीसींचे मेळावे आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या आहेत. (स्व.) गोपीनाथ मुंडे हे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी कायम भांडायचे. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र रंगली होती. त्यांच्यावर कुणाचा दबाव आला ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला होता. या मेळाव्यासाठी आलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर हे भाषण न करताच निघून गेले. त्यांनी अवघे एक मिनिट बोलून व्यासपीठ सोडले. जोपर्यंत ओबीसींचा पक्ष उभा राहत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला अर्थ राहणार नाही. काँग्रेस, भाजपचा ओबीसी नेता येईल आणि तुम्हाला लुटून नेईल. भुजबळ यांना माझी विनंती आहे की, तुम्ही पक्ष काढा आणि त्या माध्यमातून ओबीसींना उभे करा, दुसर्‍या पक्षाचे आमदार, खासदार येऊन तुम्हाला सांगतील की, ह्याला मतदान करा. त्याला ओबीसी म्हणू नका, असा सल्लाही जानकर यांनी दिला. ओबीसी मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे उशिरा आले. ते थेट हेलिकॉप्टरने अंबडमध्ये सभास्थळी दाखल झाले. त्यांचे हेलिकॉप्टर सभास्थळावरून येत असताना उपस्थितांनी एकच गलका केला. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची दिमाखदार एन्ट्री झाली.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!