– मेहकर व लोणार तालुक्यांत अॅड. सौ. तुपकरांच्या दौर्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – सोयाबीन व कापूसप्रश्नी, तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई व पीकविमा मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रा काढली असून, या रथयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे आयोजित सोयाबीन-कापूस एल्गार महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा लोणार व मेहकर तालुक्यातील शेतकर्यांनी अॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांच्याशी बोलताना निर्धार व्यक्त केला आहे. रविकांत तुपकर यांच्या सावली असलेल्या त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर यादेखील बळीराजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या असून, त्यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व महिला वर्गाशी संवाद साधला.
अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी सोयाबीन-कापूस एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल (दि.१४) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, अंजनी खु, वेणी, हिरडव, चिंचोली सांगळे, पारडा दराडे व मेहकर तालुक्यातील उकळी- सुकळी या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूर, तरुण व महिलांशी संवाद साधला. लोणार व मेहकर तालुक्यात रविकांत तुपकर यांच्या ‘एल्गार रथयात्रे’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तोच प्रतिसाद काल अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्या दौर्यालाही मिळाला. यावेळी २० नोव्हेंबरच्या एल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार लोणार व मेहकर तालुक्यातील गावकर्यांनी केला आहे. यावेळी डॉ.ज्ञानेश्वर टाले, कृष्णा पाटील इंगळे, सहदेव लाड, शिवनारायण राऊत, अनिल बोरकर, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे, श्रीकांत बोरे, संतोष शेळके, गणेश कष्टे, सतीश वाघ, जीवन घायाळ, संदीप सरकटे, संजय चाटे, वर्धमान देऊळकर, अमोल बोरे, दशरथ बोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.