कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन; काहीकाळ ‘समृद्धी’वरील प्रवास मोफत!
– टोलवसुली कर्मचार्यांची दिवाळी अंधारात, दोन महिन्यांपासून पगारच नाही!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – दररोज कोट्यवधी रूपयांची वसुली करणार्या समृद्धी महामार्गावरील टोल वसुली व मेन्टेनन्स करणार्या रोडवेज सोल्युशन कंपनीने तिच्या कर्मचार्यांना दोन महिन्यांपासून पगार व दिवाळी बोनस न दिल्याने संतप्त कर्मचार्यांनी आज (दि.१५) कामबंद आंदोलन करत, महामार्गावरील टोलदांडा वर करून वाहने सोडून दिली. तसेच, कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने या कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने कर्मचारीवर्गाने त्यांचे आंदोलन मागे घेतले व पुन्हा टोलवसुली सुरू झाली. आंदोलनाच्या काही तासाच्या कालावधीत कंपनीचे मात्र लाखो रूपयांचे नुकसान झाले. मेहकरजवळील फर्दापूर टोलनाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडला.
समृद्धी महामार्ग निर्माण झाल्यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी टोलनाके सुरू करण्यात आले आहेत. यात मेहकर येथील फर्दापूर येथील टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले. मागील दोन महिन्यांपासून कर्मचार्यांना पगार मिळाला नसल्याने संतप्त कर्मचार्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली होती. या कर्मचार्यांना दोन महिन्यापासून पगार नाही. दिवाळीत पगार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु रोडवेज कंपनीने पगार दिला नाही. याकरिता टोलनाका कर्मचार्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोलनाका काहीकाळ बंद ठेवला. या टोल नाक्यावरून जाणार्या सर्व गाडी मालकांनी टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता गाड्या टोल नाक्यातून बाहेर नेल्यात. त्यात कर्मचार्यांनी कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप केले नाही. या पूर्वी फास्ट गो कंपनीने पहिले मेहकर फर्दापूर टोल नाका चालवण्यासाठी घेतला होता. यांनी कर्मचार्यांचे पीएफ न देता कंपनी सोडून दिली व रोडवेज सोलुशन कंपनीला समृद्धी फरदापूर टोलनाका चालवण्यासाठी दिला. रोडवेज सोल्युशन कंपनीनेसुद्धा या मुलांचा पीएफ न देता दोन महिन्याचा पगारसुद्धा दिला नाही. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला आहे. तेव्हापासून कर्मचार्यांना पगारपत्र दिलेले नाही. पगारपत्र नसल्या कारनाने पीएफसुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला जर कंपनी बदलत राहिली तर कोणती कंपनी मुलांचे पगार व पीएफ देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.