घरी दिवाळी साजरी न करता तुपकर दाम्पत्य शेतकर्यांच्या बांधावर; सोयाबीन, कपाशीची पूजा करून केली दिवाळी साजरी!
– ‘एल्गार रथयात्रे’ला चिखली – बुलढाणा तालुक्यांत प्रचंड प्रतिसाद!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सोयाबीन व कापसाच्या भावासाठी, तसेच पीक नुकसानभरपाई व पीकविम्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात एल्गार पुकारला असून, यंदाचा दिवाळी सणही त्यांनी घरी साजरा न करता शेतकर्यांच्या बांधावरच ठेचा-भाकरी खाऊन साजरा केला. काल पार पडलेल्या दिवाळी-पाडवा सणाचे औक्षणदेखील अॅड. शर्वरी तुपकरांनी रथयात्रेतच केले. तसेच, दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला घरी न जाता आपल्या कुटुंबीयांसह शेतकर्याच्या शेतात अंधारात सोयाबीन व कापसाचे पूजन करून अनोख्या पद्धतीने तुपकर दाम्पत्याने शेताच्या बांधावरच आपली दिवाळी साजरी केली. विशेष बाब म्हणजे, ऐन सणासुदीत व भरथंडीत शेतकर्यांच्या हक्कासाठी जिल्हाभर रथयात्रेच्या माध्यमातून वणवण फिरणार्या पतीच्या पाठीशी शर्वरीताईदेखील पदर खोचून उभ्या असल्याचे दिसून आले असून, त्यांनीदेखील हा दिवाळी सण पतीसोबतच शेतकर्याच्या बांधावर बळीराजाने आणलेल्या चटणीभाकरीचा पाहुणचार गोड मानून साजरा केला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सध्या सोयाबीन-उत्पादक शेतकर्यांसाठी ‘एल्गार रथयात्रा’ सुरू आहे. ५ नोव्हेंबरपासून संतनगरी शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा गावागावी फिरून बैठका, सभा घेत शेतकर्यांशी संवाद साधत आहेत. दररोज वेगवेगळ्या तालुक्यात मुक्काम होत आहे. दिवाळीच्या दिवशी रविवारी ही यात्रा चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात मुक्कामी आहे . दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला घरी न जाता आपल्या कुटुंबीयांसह शेतकर्याच्या शेतात अंधारात सोयाबीन व कापसाचे पूजन करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. शेतातील सोयाबीन कापूस हीच शेतकर्यांची लक्ष्मी आहे . परंतु सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांची दिवाळी अंधारात आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी देखील आपली दिवाळी शेतातील अंधारात साजरी केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ११ नोव्हेंबरला चिखली तालुक्यात दाखल झालेल्या एल्गार रथयात्रेला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिखली तालुक्यातील ४० पेक्षा अधिक गावांचा प्रवास केल्यानंतर १३ नोव्हेंबरला रायपूर येथून यात्रेचा बुलडाणा तालुक्यातील प्रवास सुरू झाला. १३ नोव्हेंबरला यात्रेचा भडगाव येथे मुक्काम होता. १४ नोव्हेंबरला बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा, सावळी, चांडोळ, करडी, कुंबेफळ, टाकळी, सातगाव, म्हसला खुर्द, म्हसला बु, जांब, मौंढाळा, धाड, धामणगाव या गावांचा प्रवास करीत एल्गार रथयात्रा यात्रा डोमरूळ येथे मुक्कामी दाखल झाली. यात्रेदरम्यान येणार्या सर्वच गावात एल्गार यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ही एल्गार रथयात्रा १४ नोव्हेंबरला ९ व्या दिवशी बुलडाणा तालुक्यात दाखल झाली. ‘एल्गार रथयात्रे’च्या ९ व्या दिवशी करडी येथे तुपकर यांनी बलीप्रतीपदेचा उत्सव साजरा केला. यावेळी तुपकर यांनी बळीराजाच्या बैलांचे व नांगराचे पूजन केले. बैलाशिवाय शेतीची कल्पना करणे ही शक्य नव्हते. म्हणून प्रत्येक शेतकर्याकडे बैलजोडी आणि नांगर असायचा, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत बळीराजाला सुख समृद्धीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी यावेळी केली. दिवाळी पाडव्यानिमित्त ‘एल्गार रथयात्रे’दरम्यानच रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांचे औक्षण करून दिवाळी पाडवा सण साजरा केला.
रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी ५ नोव्हेंबरपासून काढलेल्या एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाचा दिवाळी सण देखील तुपकर यांनी एल्गार यात्रेतच साजरा केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुपकर यांनी चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात शेतकर्याच्या शेतात सोयाबीन कापसाचे पूजन व ठेचा भाकर खाऊन अंधारात दिवाळी साजरी केली. दरम्यान, १३ नोव्हेंबरला यात्रेचा मुक्काम भडगाव येथे होता. १४ नोव्हेंबरला बलीप्रतिपदेच्या दिवशी सकाळी यात्रा चांडोळ गावात दाखल झाली. यावेळी बैलजोडी आणि नांगराचे पूजन करून तुपकर यांनी बलीप्रतिपदेचा उत्सव साजरा केला. अॅड.शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांना दिवाळी पाडव्यानिमित्त औक्षण करून पाडवा सण साजरा केला. पती रविकांत तुपकर यांना शेतकर्यांकरिता लढण्याचे बळ दे, अशी प्रार्थना यावेळी अॅड. शर्वरी तुपकर यांनी केली.