चिखली (तालुका प्रतिनिधी) – एका २६ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मायलेकांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या तरूणाचाही गाळात फसून जीव गेला, तर या तिघांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या अन्य एका जणाचा मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेने जीव वाचला. तालुक्यातील भरोसा येथे ही दुर्देवी घटना घडली असून, आज (दि.७) या तिघांवर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भरोसा येथील विवाहिता सौ. शीतल गणेश थुट्टे (वय २६) हिने तिच्या देवांश या अवघ्या काही महिन्याच्या चिमुकल्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. काल (दि.६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसून, तीनच वर्षापूर्वी तिचा गावातील शेतकरी गणेश थुट्टे याच्याशी विवाह झाला होता. या मायलेकाला वाचविण्यासाठी गावातीलच सिद्धार्थ निंबाजी शिरसाट (वय ३६) यांनी विहिरीत उडी घेतली. सिद्धार्थ शिरसाट हे पट्टीचे पोहणारे होते. परंतु, अंधार व विहिरीतील गाळ यांच्यात ते फसले आणि दुर्देवाने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या तिघांना वाचविण्यासाठी गावातीलच सुखदेव त्र्यंबक थुट्टे (वय ५५) यांनी विहिरीत उडी घेतली. तेही बुडू लागल्यानंतर काठावरील गावकर्यांनी तातडीने विहिरीत दोर सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी अंढेरा पोलिसांना दिली असताना, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार व विहिरीत गाळ असल्याने रात्रभर मृतदेह विहिरीतच होते. पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात शवपरीक्षण केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
या दुर्देवी घटनेत मृत महिलेचा पती गणेश थुट्टे हा शेती व शेतमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. तीन वर्षांपूर्वी त्यांचा शीतलसोबत विवाह झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर देवांशच्या रुपाने फुलही उमलेले होते. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता चिमुकला देवांश घरासमोर खेळत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून शीतल यांनी पतीला पाठविला होता. मात्र, शीतल यांनी हे टोकाचे टाकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुर्घटनेतील तिघांवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मृत शीतल व निष्पाप चिमुकला देवांश यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.