बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – सोयाबीन, कापसाला प्रतिएकरी दहा हजारांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी, राज्यात दुष्काळ जाहीर व्हावा, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे एल्गार रथयात्रा घेऊन बुधवारी (दि.८) तालुक्यातील मांडवा येथे येत आहेत. त्यांची जाहीर सभा पार पडणार असून, या सभेला परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.
सोयाबीन व कापसाचे पडलेले भाव व दुष्काळाची मदत तसेच शंभर टक्के पीकविम्याची मदत मिळवून घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ६ नोव्हेंबरपासून विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथयात्रा सुरू केली आहे. सदर रथयात्रा ही संपूर्ण जिल्हाभर फिरणार असून, यात्रेच्या माध्यमातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकर्यांमध्ये जनजागृती करणार आहेत, व त्या यात्रेचा समारोप दिनांक २० नोव्हेंबररोजी होऊन शेतकर्यांचा भव्य मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्या अनुषंगाने तुपकर हे ८ नोव्हेंबर रोजी मांडवा येथे येत असून, त्या ठिकाणी रात्री ठीक ७ वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.