चिखली (महेंद्र हिवाळे) – भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्नल रोहित चौधरी हे पिंपळगाव सराई येथील वीरजवान अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची विचारपूस व सांत्वन करण्यासाठी गुरूवारी (दि.२६) पिंपळगाव सराई येथे येत आहेत. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून ते गवते कुटुंबीयांची भेट घेणार असून, अक्षयच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत.
बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते (वय २०) यांना सियाचीनमधील ग्लेशीअर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्यावर सोमवारी, २३ ऑक्टोबरला सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील ग्लेशीअरमध्ये ते कर्तव्यावर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र २० ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीटरवर श्रध्दांजली अर्पण करत अग्निवीरांच्या विविध समस्यांवर केंद्रातील सरकारला प्रश्न विचारले होते. गुरुवारी (दि.२६) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी हे अग्निवीर अक्षय गवते यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे – गुरूवार, २६ ऑक्टोबर २०२३. स. ०४.४५ वा. दिल्लीवरून प्रयाण. स. ०७.०० वा. औरंगाबाद विमानतळावर आगमन. स.११.०० वा. अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली व शहिदांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. दु. ०१.०० वा. बुलढाणा येथे पत्रकार परिषद. स्थळ : हॉटेल रामा ग्रँटचे सभागृह बसस्टँड समोर बुलढाणा. दु. ०१.३० वा. माजी सैनिकांसोबत संवाद. स्थळ : हॉटेल रामा ग्रँट सभागृह. दु.३.०० वा. औरंगाबादसाठी रवाना. सायंकाळी ०६.४५ वा. औरंगाबाद विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना. ————-