वारकरी संप्रदयाचे उर्ध्वयु ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांचे वैकुंठगमन!
– वारकरी संप्रदयासह सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदयावर दुःखाचा डोंगर कोसळला!
नवी मुंबई (क्षीप्रा कांबळे) – ज्ञानोबारायांचा हरिपाठ घरोघरी पोचवणारे, पुराणातील दृष्टांत कसे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत हे आपल्या कीर्तनातून सांगणारे वारकरी संप्रदायाचे उर्ध्वयु ज्येष्ठ कीर्तनकार, निरूपणकार, समाजसेवक परमपूज्य गुरूवर्य हभप. बाबा महाराज सातारकर यांचे आज (दि.२६) पहाटे सहा वाजता वृद्धपकाळाने वैकुंठगमन झाले. त्यांच्या वैकुंठगमनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह.भ.प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिलीप महाजन यांनी बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांचे पार्थिव सिवूड्स येथे ठेवण्यात आले आहे. तेथे अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. राज्यभरातून वारकरी व नागरिक अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत.
वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर हे नवी मुंबईतील नेरूळमध्ये वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर उर्फ माईसाहेब यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते. त्यांनी ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबामहाराज सातारकर यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानात त्यांचा मोलाचा वाटा होता. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर मुली व नातवंडांच्या सहवासात राहणारे बाबा महाराज सातारकर हे मनाने काहीसे एकटे पडले होते. बाबा महाराजांचे खरे नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म गोरे-सातारकर या प्रतिष्ठीत घरात झाला. त्यांना आध्यात्माची ओढ घरातूनच निर्माण झाली. वारकरी संप्रदयातील प्रमुख कीर्तनकारांचा फड म्हणून सातारकर घराण्याला ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून सातारकरांच्या घरी प्रवचन, कीर्तन आणि निरूपणाची परंपरा आहे. बाबामहाराजांच्या पश्च्यात त्यांच्या कन्या हभप. भगवती महाराज यांनी ती जोपासली आहे. बाबा महाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इयत्ता दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या बाबा महाराजांनी पुढे कीर्तनातून प्रबोधनाची वाट धरली आणि समाजप्रबोधन केले. त्यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. घराण्यातील वारकरी संप्रदयाची १३५ वर्षांची परंपरा त्यांनीही पुढे सुरू ठेवली. त्यामुळे तीन पिढ्यांपासून मिळालेला कीर्तनाचा व प्रवचनाचा वारसा त्यांनी जपला. बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.
वास्तविक पाहाता, नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचे मूळ नाव होते. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळाले, ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिले. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते. १९५० ते १९५६ या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. ‘१९५६ मध्ये माझा पाच ते सहा लाखांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण तो व्यवसाय मी करणे थांबवले. जे काही होते ते कवडीमोल दरात विकलं. मी माझ्या वडिलांना सांगितले की ज्याला भांडवल लावले आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकले आहे ते टिकवून धरु. जे प्रारब्धात असेल ते होईल. असे सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करु लागलो’ असे बाबामहाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली
आज मी बाब्ाा महाराज सातारकरांच्या निधनाचे वृत्त ऐकले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो. बाबा महाराज सातारकर हे देशाचे वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबा महाराज सातारकर आज वैकुंठवासी झाले. त्यांनी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे जनजागृतीचे काम केले ते येणार्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. बाबा महाराज सातारकर हे अत्यंत साधेपणाने आणि सरळ संवाद साधत असत. बाबा महाराज सातकरकर यांची वाणी आणि शैली लोकांचे मन जिंकत असे. त्यांच्या वाणीमध्ये कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ऐंशी व नव्वदच्या दशकात ऑडिओ कॅसेटचा जमाना होता. त्यावेळी मराठी घरांत बाबा महाराजांच्या प्रवचनाची कॅसेट हटकून असायची. महाराष्ट्राच्या घराघरांत एकेकाळी बाबा महाराजांच्या रसाळ कीर्तनावर ‘प्रवचनं’ व्हायची, इतके गारुड त्यांनी जनमानसावर केले होते. बाबा महाराजांचा आवाज ऐकला की क्षणभर स्तब्ध झाला नाही असा माणूस विरळाच. पांढरा शुभ्र पोषाख आणि तेजस्वी चेहरा लाभलेल्या बाबा महाराजांना ऐकतानाच त्यांना कीर्तनाच्या व्यासपीठावर पाहणे हादेखील एक सोहळा असायचा. कीर्तनाला येणार्या प्रत्येकाला ते तुळशीची माळ घालण्याचा आग्रह करायचे. सर्वसामान्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, हा हेतू त्यामागे होता. हे करताना तुळशीचे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व सांगण्यास ते विसरायचे नाहीत.
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ।।
आता निश्चिंतीने पावलो विसावा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ।।
कवतुक वाटे जालिया वेचाचे । नाव मंगळाचे तेणे गुणे ।।
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ।