BuldanaHead linesMaharashtraVidharbhaWorld update

अग्निवीर योजना भारतीय सेनेत फूट पाडणारी; देशाची सुरक्षा धोक्यात!

– पुरेसे प्रशिक्षण न देता अक्षय गवतेंना सियाचीनसारख्या धोकादायक ठिकाणी पाठविल्यानेच कोवळ्या वयात त्यांचा मृत्यू!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – अग्निवीर शहीद व्हायला लागल्यावर या योजनेतील फोलपणा व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेमागचे वास्तव समोर आले आहे. ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून, त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल (निवृत्त) रोहित चौधरी यांनी येथे केला. अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणार्‍या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. आता अग्निवीर वीरगतीला प्राप्त होत असल्याने या योजनेतील कच्चे दुवे स्पष्ट होत आहे. सोबतच भारतीय सैन्यदलात यामुळे उभी फूट पडू शकते, अशी टीकाही कर्नल चौधरी यांनी केली. देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते हे सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते २६ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे आले होते.

कर्नल रोहित चौधरी यांनी आज (दि.२६) पिंपळगाव सराई (तालुका बुलढाणा) येथील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर बुलढाण्यातील हॉटेल रामा ग्रँड येथे पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अग्निवीर योजनेचा फोलपणा उघड केला. यातील कच्चे दुवे व देश सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करताना कर्नल चौधरी म्हणाले, की भारतीय सैन्यात नियमित सैनिक व अल्पकाळ सेवा करणारे अग्निवीर अशी फूट पाडली गेली आहे. काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी हा धोका आधीच अ‍ोळखत या योजनेला प्रखर विरोध केला आहे. दरम्यान, नियमित सैनिक व अग्निवीर यांना मिळणारे वेतन, आर्थिक लाभ, सेवा काळ, यात मोठी तफावत आहे. अग्निवीराला पेन्शन, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा नाहीत. तारुण्यातच ते निवृत्त होतील. त्यातच माजी सैनिकांचा दर्जा नसल्याने सैन्याकडून मिळणारे अनेक लाभही त्यांना मिळणार नाहीत. शहीद अग्निवीर अक्षय गवतेंमुळे आता अनेक बाबी समोर येत असल्याचे चौधरी म्हणाले. सैनिकाला दीर्घ प्रशिक्षण आवश्यक असताना केवळ सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांची थेट सियाचीन ग्लेशियरसारख्या धोकादायक ठिकाणी नियुक्ती करण्यात येते. बुलढाण्याचे शहीद अक्षय हे याचे उदाहरण ठरले आहे. पंजाबमधील शहीद अग्निवीराला तर मानवंदनासारखा सन्मानसुद्धा मिळाला नाही. यामुळे येत्या पाच वर्षात भारताची सैनिक संख्या १५ वरून १० लाखपर्यंत जाईल. यामध्ये अडीच लाख अग्निवीर असतील, असे भाकित त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, समन्वयक संदेश सिंगलकर, आ. धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे उपस्थित होते.


अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना एक कोटी रूपये, 10 एकर शेती द्यावी!

अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये द्यावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर करणे ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया कर्नल चौधरींनी दिली. सोबतच ही योजना कायम ठेवायची असेल तर नियमित सैनिक व अग्निवीर यामधील भेद दूर करून ते समान पातळीवर आणावेत. केंद्र व राज्याचेही सैनिकाप्रती दायित्व आहे. शहिदाला १ कोटीची मदत, घरातील एकाला शासकीय नोकरी, १० एकर शेती देण्याची मागणी चौधरी यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!