अजितदादांच्या समोरच मोदींची शरद पवारांवर नामोल्लेख टाळून टीका!
– मोदींच्या भाषणात मराठा आरक्षणाचा एक शब्दही निघाला नाही!
शिर्डी (खास प्रतिनिधी) – देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्याने शेतकर्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर शिर्डीतील जाहीर सभेतून नामोल्लेख टाळून जोरदार टीकास्त्र डागले. विशेष म्हणजे, पवारांचे सख्खे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोरच मोदी हे शरद पवारांवर टीका करत होते, आणि अजितदादा ती ऐकत होते. शरद पवारांनी शेतकर्यांच्या नावावर केवळ राजकारण केले, असेही मोदी पवारांचा नामोल्लेख टाळून म्हणाले. या घटनेची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या शिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींनी अवाक्षरही काढले नाही. या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा देणारे संभाजी बिग्रेड आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
PM @narendramodi prays at Shri Saibaba Samadhi Temple in Shirdi, Maharashtra. pic.twitter.com/85KEXEJkwc
— PMO India (@PMOIndia) October 26, 2023
शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरातील विविध विकासकामांचे उदघाटन, तसेच अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या कालव्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. यानंतर काकडी येथे आयोजित जाहीर सभेत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मोदी म्हणाले, की मी महाराष्ट्रातील त्या वरिष्ठ नेत्यांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण पण शेतकर्यांसाठी त्यांनी काय केले. आम्ही सच्च्या मनाने महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या सन्मानासाठी काम केले आहे. परंतु, या नेत्यांने शेतकर्यांच्या नावाखाली केवळ राजकारण केले. महाराष्ट्रातील हे नेते केंद्रात कृषिमंत्री होते, सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकर्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या आधारभूत किमतीवर (एमएसपी) धान्य खरेदी केले. आमच्या सरकारने सात वर्षात एमएसपीच्या स्वरुपात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात टाकले आहेत. ते कृषिमंत्री असताना, शेतकर्यांना आपल्या हक्काच्या पैशासाठीही मध्यस्थांच्या भरवशावर राहावे लागत होते, महिनोमहिने शेतकर्यांना पैसे मिळत नव्हते. पण आमच्या सरकारने शेतकर्यांचा पैसा एमएसपीच्या स्वरुपात त्यांचा खात्यात टाकण्याची सुविधा दिली, असेही मोदी यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि मराठा आंदोलकांनी बहिष्कार टाकण्याचा केलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. खचाखच भरलेल्या सभेत मोदी यांनी केंद्र आणि राज्याची विकास कामे मांडली. २०४७ मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी आपला देश जगातील विकसित राष्ट्र करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांसह इतर वक्ते आणि स्वत: मोदी यांनीही मराठा आरक्षणावर अवाक्षरही काढले नाही. या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा देणारे संभाजी बिग्रेड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. शिर्डीत येताच मोदींनी साईसमाधी दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या कालव्याचे उदघाटन केले.
————–