– सोयाबीनचे एकरी २ ते ३ पोते उत्पादन, खर्चसुद्धा निघला नाही, शेतकरी हवालदिल!
चिखली (कैलास आंधळे) – सोयाबीन व कपाशीने शेतकर्यांना धोका दिला असून, सोयाबीनचा एकरी दोन ते तीनच पोते उतारा हाती आला आहे. त्यामुळे जेवढा खर्च केला तेवढाही भरून निघत नसल्याने हे पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळी सण तोंडावर आला असून, हाती पैसे नसल्याने हा सण साजरा करायचा कसा, अशा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी एकरी दहा हजार रूपयांची सरसकट मदत द्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकर्यांची दिवाळी तोंडावर असतानाच दोन्ही पिकाची ऐसीतैसी झाल्याचे समोर येत आहे. देऊळगावराजा व चिखली तालुक्यातील शेतकर्यांची अतिशय बिकट स्थिती झाली असून, या दोन्ही पिकांवर हजारो रूपये खर्च करून शेतकर्यांनी सोयाबीन पिकात शेतकर्यांच्या पदरी हाती भोपळाच आला. सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची स्थिती तर अत्यंत वाईट आहे. देऊळगावराजा तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील सोयाबीन उत्पादक शेतकर्याला चार एकरात नऊ पोतेच उत्पादन झाल्याचे समोर आले आहे. एकरी एक किंवा दोन पोते उत्पादन झाल्याने वाकी बुद्रूकसह चिखली व देऊळगावराजा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दिवाळी अंधारातच जाणार, एवढे मात्र निश्चित. सोयाबीन पिकाला नगदी पीक म्हटले जाते, कारण सोयाबीन पीक दिवाळीपूर्व निघते. याच पिकाच्या भरवश्यावर शेतकरी आपली दिवाळी साजरी करतो, सोबतच त्याच्या विविध गरजांची पूर्ततासुद्धा सोयाबीन पिकावर करतो. पहिल्यांदा सोयाबीन पिकावर येलो मोझेक रोगाने व अपुर्या पावसाने सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बहुतेक खरिपाच्या हंगामातील सोयाबीन पिकाची मळणी सुरू असून, चिखली, देऊळगावराजा तालुक्यातील काही परिसरात सोयाबीनची मळणी केल्यानंतर शेतकर्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. काही शेतकर्यांना एकरी २ किंवा ३ क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळत आहे. तर काहींना केवळ कुटारावरच समाधान मानावे लागत असल्याचे दुर्देवी चित्र जिल्ह्यात आहे. विशेष म्हणजे, फुले संगम, फुले किमया या जातीच्या सोयाबीनची शेंगच भरली नसल्याने, हे सर्व वाण जास्त कालावधीनंतर येणारे असून, त्याला पाणी कमी पडले आहे. यामुळे ज्वारीच्या दाण्यापेक्षा ही बारीक दाणे आहेत, हे बारीक दाणे कुटारासोबतच उडून जात आहे, यामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. परिणामी, लागवड खर्च तर सोडाच साधा मळणीचासुद्धा खर्च निघत नाही, यामुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, लागवडीसाठी वारेमाप खर्च झाला, पण उत्पादन तोकडे होत असल्याने शेतकर्यांची चांगलीच दमछाक होत आहे.