BuldanaBULDHANACrimeHead linesVidharbha

डोळ्यात मिरचीपूड टाकून दरोडे घालणार्‍या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – नांदुरा व किनगावराजा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत डोळ्यात मिरचीपूड टाकून रोड रॉबरी व दरोडे घालणार्‍या टोळ्या जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, या टोळ्यांकडून सहा लाख ३७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे.

मलकापूर येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे राहणारे राजू हरी गव्हाळे हे किराणा मालाची वसुली करण्यासाठी बोलोरो पीकअप वाहनाद्वारे दि.१८ ऑक्टोबररोजी गेले असताना, ते रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव जामोद ते नांदुरा या रस्त्याने येत असताना येरळी पुलाजवळ अज्ञात आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या बोलोरो पीकअपला अडविले होते. तसेच, गव्हाळे यांच्यासह त्यांच्या चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख ७८ हजार रूपये असलेली बॅग घेऊन जळगाव जामोदच्या दिशेने पळून गेले होते. या बाबत नांदुरा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व नांदुरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून या गुन्ह्यात अंशू विजय जावळेकर (वय १९) रा. आठवडी बाजार, मलकापूर व एका विधीसंघर्षीत १७ वर्षीय बालकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख ५३ हजार ४९० रूपये, चोरीच्या रकमेतून विकत घेतलेला अ‍ॅपल मोबाईल (किंमत ५१ हजार), गुन्ह्यात वापरलेली रेसर बाईक किंमत दीड लाख रूपये असा दोन लाख ५४ हजार ४९० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दुसर्‍या एका घटनेत, किनगावराजा (ता.सिंदखेडराजा) येथील विष्णू पंढरीनाथ काकड (वय ३४) हे किनगावराजा येथील टापरे सुपरमार्वेâट येथे वसुलीच्या कामावर आहेत. १९ ऑक्टोबररोजी ते बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड येथून वसुली करून येत असताना दुसरबीड ते राहेरीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी अडविले व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याना खाली पाडले, तसेच त्यांना मारहाण करून त्यांची पैशाची बॅग हिसकावून घेऊन पळ काढला. या बॅगमध्ये वसुली करून आणलेले चार लाख ४३ हजार ३७२ रूपये इतकी रक्कम होती. हा गुन्हा देखील स्थानिक गुन्हे शाखा व किनगावराजा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे उघडकीस आणून आरोपी बाळू भागाजी मकळे (वय २६) रा. डॉ. आंबेडकर नगर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, रामेश्वर उर्फ परश्या अंकुश हिवाळे (वय २८) रा. मुकूंदवाडी, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, अजय संजय जाधव (वय २४) रा. सुतगिरणी गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर, आकाश प्रभाकर साळवे (वय २५) रा. मुकूंदवाडी, छत्रपती संभाजीनगर या प्रत्यक्ष दरोडा टाकणार्‍या आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर वैâलास गबाप्पा जितकर (वय ४४) रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा व लक्ष्मी मधुकर बोरूडे (वय ४३) रा. पढेगाव, छत्रपती संभाजीनगर यांना आज (दि.२५) रोजी अटक करण्यात आली असून, त्यांनी दरोड्याचा कट रचून दरोडा घालण्यासाठी मदत केली असल्याचे पुढे आले आहे. या कारवाईत रोख रक्कम दोन लाख १२ हजार ९०० रूपये, चार मोबाईल फोन, दोन दुचाकी वाहने असा तीन लाख ८२ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्हीही गुन्ह्यांचे गांभीर्य पाहाता, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करत, मलकापूर उपविभागीय अधिकारी डी. एस. गवळी, देऊळगावराजा उपविभागीय अधिकारी अजयकुमार मालवीय, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, नांदुरा व किनगावराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार, व स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांचे प्रत्येकी तीन पथके तयार करून गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून रोड रॉबरी करणार्‍या दरोडेखोरांच्या या दोन टोळ्या जेरबंद केल्या आहेत. या टोळ्यांचा कसून तपास सुरू असून, आणखीही काही गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!