– अनेक कुणबी, मराठा समाजातील युवक-युवतीही करत आहेत ‘अमृत’कडे अर्ज
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या संस्थेचे कामकाज वेगाने सुरू झाल्यानंतर राज्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु दुर्बल घटकांतील युवक-युवती व गरजुंकडून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. परंतु, या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ हा, ज्या जाती किंवा घटकांना सरकारच्या कुठल्याही स्वतंत्र विभाग, संस्था अथवा महामंडळांकडून लाभ मिळत नाही, अशा दुर्बल घटकांना दिला जातो. मराठा समाजासाठी ‘सारथी’ तर कुणबी समाजासाठी ‘महाज्योती’ या संस्था कार्यरत असतानाही, या समाजातील गरजवंतदेखील ‘अमृत’कडे अर्ज करत असल्याने या संस्थेची मोठी डोकेदुखी वाढल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून हाती आली आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अशा जाती, ज्यांच्यासाठी कुठलेही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था अथवा महामंडळ कार्यरत किंवा अस्तित्वात नाही, अशा जाती व घटकांच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी राज्य सरकारने ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या कार्याने प्रचंड गती घेतल्यानंतर अनेक खुल्याप्रवर्गातील जाती व घटकदेखील ‘अमृत’कडे या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असल्याचे दिसून आले आहे. खास करून मराठा समाजातील उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असले तरीसुद्धा त्यांच्यासाठी ‘सारथी’ नावाची राज्य सरकारची स्वतंत्र स्वायत्त संस्था कार्यरत आहे, व त्या संस्थेकडून विविध योजनांचा लाभ मराठा समाजातील उमेदवारांना मिळत असतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मराठा उमेदवारांनी ‘सारथी’ या स्वायत्त संस्थेकडे अर्ज करणे अपेक्षित आहे, ‘अमृत’कडे नव्हे; हीच बाब कुणबी समाजासाठीसुद्धा लागू आहे. त्यांनीसुद्धा राज्य सरकारच्याच ‘महाज्योती’ या स्वतंत्र स्वायत्त संस्थेकडे अर्ज करणे अपेक्षित आहे, अमृतकडे नव्हे. तरीदेखील मराठा व कुणबी समाजातील युवक-युवती, लाभार्थी ‘अमृत’कडे अर्ज करत असल्याने या संस्थेच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठेच संकट उभे ठाकले आहे. याबाबत उमेदवारांना खुलासा करताना या यंत्रणेच्या चांगलेच नाकीनऊ येत असल्याचे दिसून येत आहे.